नागपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या कानशिलात लगावणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते व शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आमदार पडळकर यांनी टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी पडळकर यांच्या छायाचित्राला काळे फासल्यानंतर त्यांच्या कानशिलात लगावण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. पडळकर यांच्या विरोधात मंगळसूत्र चोरल्याचे गुन्हे दाखल असल्याने कोल्हापूर येथून अधिक माहिती काढत आहोत. त्यांना कसा धडा शिकवायचा, यासाठी आम्ही सक्षम आहोत. युवक आघाडीने त्यांच्या छायाचित्राला काळे फासले आता पुतळा जाळण्यात येईल, असा इशाराही प्रशांत पवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिला.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढत असल्याचा पडळकर यांचा देखावा आहे. पक्षाचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना राज्यात कुणीही मारहाण केल्यास नागपूर कार्यालयातून एक लाख रुपये देण्यात येतील. नागपूरला आल्यास त्यांना सोडणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही प्रशांत पवार म्हणाले.
पत्रपरिषदेला शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, युवकचे अध्यक्ष विशाल खांडेकर, माजी नगरसेवक राजेश माटे, सरचिटणीस मिलिंद महादेवकर, तुषार दाभाळे, प्रकाश डोंगरे आदी उपस्थित होते.