मराठा आरक्षणासाठी सुदर्शन कामारीकर हे गावातील सहकार्यासोबत गावात उपोषणास बसले होते. मागील दोन दिवसांपासून उपोषण सुरु होते. उपोषण सुरु असताना सुदर्शन याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने रविवारी रात्री गुरांच्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी देखील लिहल्याची माहिती आहे. “मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे” असे स्पष्टपणे सुसाईड नोट मध्ये असल्याचे सांगण्यात येतं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यात या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.
पालकमंत्री भेटल्याशिवाय पार्थिव ताब्यात घेणार नाही, आंदोलक आक्रमक
दरम्यान या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जो पर्यंत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन गावाला भेट देणार नाहीत. सुदर्शनच्या कुटुंबाचं पुनवर्सन करणार नाही तोपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, असा आरोप मराठा समाजाने केला आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकार आणखी किती बळी घेणार ?
जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो तेव्हा तेव्हा मराठा समाजातील युवा वर्ग हा अतिशय भावनिक होऊन अतिशय टोकाची भुमिका घेण्यासाठी मजबूर होतो. कारण या राज्यकर्त्याकडून आजपर्यंत मराठा आरक्षणावर कुठलीच ठोस भुमिका न घेता केवळ आणि केवळ वेळकाढू पणा करीत मराठा समाजाची घोर फसवणुकच करण्यात आली आणि याच राजकीय उदासीनतेतून आजतगायत जवळपास ५० बळी या केवळ एका मुद्द्यावर गेलेत.अंतरवाली सराटी च्या आंदोलना नंतर मागील १५ दिवसातला हा दुसरा बळी शासनाने आज घेतला आहे. असे किती बळी घेतल्यावर मराठा समाजाच्या पदरात सरकार आरक्षण टाकणार आहे, हे शासनाने एकदाचं स्पष्ट करावं. अन्यथा कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसीतून आरक्षण देऊन तात्काळ मराठा समाजाचा हा ज्वलंत प्रश्न निकाली काढावा. अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांनी केली आहे.