• Sat. Jun 13th, 2026
    Nanded News : पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवाराकडून पैशांची मागणी, पोलीस कर्मचारी निलंबित

    पोलीस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेला मदत करतो सांगून उमेदवाराकडून पैशांची मागणी करणं एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडलं आहे. पोलीस अधिक्षकांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : राज्यातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीत आपलं नशीब आजमवतात. पोलीस भरतीची परीक्षा देवून पोलीस व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी तरुण पोलीस भरतीची तयारी करतात. प्रत्यक्ष भरतीला सामोरं जातात. यासाठी ते मैदानी चाचणी देतात. त्यानंतर लेखी परीक्षा देखील देतात. या सर्व चाचणीनंतर पोलीस भरतीसाठी निवड केली जाते. अतिशय नियमांनुसार आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते. ही प्रक्रिया तशी कठीण असते. जो नियमित अभ्यास करतो त्याच विद्यार्थ्याला अशा परीक्षांमध्ये यश मिळतं. पण अशा विद्यार्थ्यांसोबत ओळख निर्माण करुन पैशांची मागणी करुन पोलीस भरतीमध्ये समाविष्ट करुन घेण्याचं आमिष दाखवण्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

    पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत मदत करतो म्हणून उमेदवारांना पोलीस कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे. नागनाथ माधव नागरगोजे असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पारदर्शक भरती प्रक्रियेला पोलीस कर्मचाऱ्याकडूनच गालबोट लागल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

    नांदेडमध्ये एकूण 199 जागेसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे . या 199 जागेसाठी 14 हजार 682 उमेदवारांनी अर्ज केले होते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मैदानी चाचणीमध्ये अडीच हजार उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या उमेदवारांची रविवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात परीक्षा देखील घेण्यात आली होती. मात्र शनिवारी नागनाथ नागरगोजे यांनी उमेदवाराकडून पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आले. पैशांची मागणी केल्याचे संभाषण समोर आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी नागरगोजे यांना तात्काळ निलंबित केले.

    नागनाथ नागरगोजे हे पोलीस मुख्यायात पोलीस अंमलदार पदी कार्यरत आहेत. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरु आहे. याच दरम्यान नागरगोजे यांनी काही विद्यार्थ्यांशी ओळख करून घेतली. त्यानंतर त्यांना लेखी परीक्षेत मदत करतो, असे म्हणून पैशांची मागणी केल्याचे उघड झाले. दरम्यान निष्पक्ष आणि पारदर्शन भरती प्रक्रिया सुरु असून या भरती प्रक्रियेत पैशांच्या आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे. कोणी पैशांची मागणी करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा