• Sat. Sep 21st, 2024
वाघाच्या बछड्यांचं नामकरण, अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवार-शिंदेंनी…

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर खोचक आणि डिवचणाऱ्या शैलीत टीका करत असतात. या सगळ्यातून अनेकदा मजेशीर प्रसंगही उद्भवतात. असाच काहीसा प्रकार रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक बछडा दुर्दैवाने दगावला होता. मात्र, उर्वरित दोन बछडे हे सुखरुप असून त्यांच्या नामकरणाचा कार्यक्रम रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून या बछड्यांचे नामकरण करण्यात आले. मात्र, या नामकरणापेक्षा योगायोगाने घडलेल्या एका वेगळ्याच प्रसंगाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बघा साहेब, हा आहे सिन्नरचा दुष्काळ..! शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा

वाघांच्या बछड्यांचे नामकरण करण्यासाठी कार्यक्रमस्थळी चिठ्ठ्यांनी भरलेली दोन काचेची पात्र ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांड्यातून पहिली चिठ्ठी उचलली. त्यामध्ये ‘श्रावणी’ असे नाव लिहले होते. त्यानुसार वाघाच्या मादीचं नामकरण ‘श्रावणी’ असे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी,’श्रावणात जन्माला आली म्हणून श्रावणी’, अशी शाब्दिक कोटीही केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांड्यातील चिठ्ठी उचलली. अजित पवारांनी उचललेल्या चिठ्ठीत ‘आदित्य’ हे नाव आले. हे नाव वाचताच अजित पवारांच्या चेहऱ्यावर हास्याची छटा पसरली. त्यांनी हसतहसतच ही चिठ्ठी शेजारी उभे असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दाखवली. कदाचित राजकीय कारणामुळे असेल, सुधीर मुनगंटीवार यांनी कोणाच्याही लक्षात येणार नाही, या अपेक्षेने वाघाचे नामकरण ‘आदित्य’ असे करण्यास नकार दर्शविला. एव्हाना हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही लक्षात आला. एकनाथ शिंदे यांनी चपळाई दाखवत अजित पवार यांच्यासमोरील काचेच्या पात्रातून आणखी एक चिठ्ठी उचलली. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये आपापसात थोडीफार चर्चा झाली. यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा काचेच्या पात्रातून चिठ्ठी उचलली. त्यामध्ये विक्रम असे नाव आले. त्यानुसार दुसऱ्या बछड्याचे नामकरण विक्रम असे करण्यात आले. एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी चलाखीने ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी बाजूला सारली. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार टिपला गेला. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.

सरकारमध्ये भाजपचे फक्त पाच-सहा जण, इतकं सगळं करुन काय हाती लागलं? आदित्य ठाकरेंचा सवाल

आदित्य ठाकरे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील: चंद्रकांत खैरे

सत्ताधारी आदित्य ठाकरे यांना घाबरतात. मात्र एक दिवस आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील. माझं हे वाक्य लिहून ठेवा. लवकरच आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील. काहीजण ठाकरे परिवाराचा द्वेष करतात. पण याच ठाकरेंनी त्यांना मोठं केलं, याचा त्यांना विसर कसा पडू शकतो, असा सवाल ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed