• Mon. Nov 25th, 2024

    दिवा २०१६ हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; भांडण सोडवणे जीवावर बेतले, काय आहे प्रकरण?

    दिवा २०१६ हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; भांडण सोडवणे जीवावर बेतले, काय आहे प्रकरण?

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान भांडणामध्ये होऊन ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकाची कात्रीने हल्ला करून हत्या करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेप ठोठवली. आकाश दिलीप उत्तेकर असे या आरोपीचे नाव आहे. तर, अन्य सात आरोपींची निर्दोष सुटका झाली. नुकताच हा निकाल लागला असून हत्येचा हा प्रकार २०१६ मध्ये दिव्यात घडला होता.

    काय आहे प्रकरण?

    दिव्यातील बी. आर. नगरमध्ये वास्तव्यास असलेला एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वादातून अधूनमधून भांडणे होत होती. १४ एप्रिल २०१६ रोजी पुन्हा भांडण झाल्याने या व्यक्तीच्या पत्नीने माहेरच्या लोकांना फोन करून घरी बोलवले. त्यानुसार घरी तिचा भाऊ आरोपी आकाश दिलीप उत्तेकर तसेच अन्य एक भाऊ, वडील, आणि इतर नातेवाईक असे एकूण सात जण घरी आले. या नातेवाईकांपैकी एकाने महिलेच्या पतीला बेल्टने तर आकाश आणि त्याच्या भावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणाचा आवाज ऐकून ही भांडणे सोडवण्यासाठी काही जणांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यातील आकाश राऊत आणि सनी पवार हे त्या लोकांना समजावत असताना आकाश याने कपडे कापण्याच्या मोठ्या कात्रीने राऊत याच्यावर वार केले. यामध्ये राऊत जखमी झाला. त्यानंतर आकाशने पवार याच्यावरही वार केल्याने तोही गंभीररित्या जखमी झाला. हा प्रकार पाहून समीर मंगेश देवळकर हा पवार याला सोडवण्यासाठी गेल्यानंतर आकाशने त्याच्या छातीमध्ये कात्री भोसकली. मुलाला वाचवण्यासाठी धाव घेणाऱ्या समीरच्या वडिलांवरही आकाशने कात्रीने वार केले. या हल्ल्यात समीर याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच अन्य कलमातंर्गत आरोपी आकाश उत्तेकर याच्यासह त्याचे वडील, भाऊ, बहीण तसेच अन्य अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या सर्वांना अटकही केली.

    १० वर्षीय मुलीसोबत नात्यातीलच नराधमाचे संतापजनक कृत्य; मारुन टाकण्याची धमकी दिली अन्…
    मुंब्रा पोलिसांनी सखोल चौकशी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भागवत यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू होती. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्या. भागवत यांनी सात आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तर, भादंवि कलम ३०२, ३२३ अंतर्गत आकाश उत्तेकर याला जन्मठेप आणि ५०० रुपये दंड ठोठवला. दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावासाची शिक्षाही न्यायालयाने आरोपीला ठोठवली आहे. कलम ३२४ मध्ये देखील आकाशला न्यायालयाने एक वर्षांचा कारावास आणि ५०० रुपये दंड ठोठवला आहे. दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास आरोपीला भोगावा लागणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed