एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात २,२१२ अंगणवाड्या आहेत. येथे शून्य ते सहा वर्षे वयोगटातील १ लाख ३४ हजार ३२५वर बालकांचे संगोपन केले जाते. त्यांना पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्यविषयक नोंदी तसेच स्तनदा, गर्भवती, किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते. याखेरीज शासनाचे लसीकरण, विविध आजाराच्या सर्वेक्षणातही अंगणवाडी केंद्राच्या सेविका, मदतनिसांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो.
जिल्ह्यातील २८८ केंद्रांत मदतनिसांची पदे रिक्त होती. त्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने भरती प्रक्रिया राबविली. मदतनीसपदासाठी बारावी पास पात्रता व स्थानिक महिला उमेदवारांना प्राधान्य देत तालुका बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. एका जागेसाठी चार ते पाच अर्ज आले. यात उच्चशिक्षित महिला उमेदवारसुद्धा असल्याचे समोर आले.
मदतनिसांना केवळ साडेपाच हजार रुपये दरमहा तर सेविकांना १० हजार ३०० रुपये मानधन दिले जाते. सरकारी नोकरी म्हणून उच्चशिक्षितांची पसंती या पदाला मिळत असल्याचे या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यातील २७७ जागांवर नियुक्ती करण्यात आली. मात्र, ११ जागांवर तक्रारी प्राप्त झाल्यात. या तक्रारींच्या निराकरणानंतर या जागांचाही मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली.