• Sat. Sep 21st, 2024

पुणेकरांनो वीजचोरी कराल तर खबरदार! खावी लागेल जेलची हवा, एकाच दिवसात १३९० वीजचोऱ्या उघड

पुणेकरांनो वीजचोरी कराल तर खबरदार! खावी लागेल जेलची हवा, एकाच दिवसात १३९० वीजचोऱ्या उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विजेच्या तारेवर हुक टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या आणि बेकायदा वीजवापर करणाऱ्यांविरोधात ‘महावितरण’कडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी १७०७ ठिकाणी बेकायदा वीज वापरकर्त्यांना दणका देण्यात आला. या मोहिमेत १३९० वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत.

पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिह्यांत एकाच वेळी दिवसभर झालेल्या या कारवाईत १३ लाख ४९ हजार युनिट म्हणजे दोन कोटी १९ लाख ७८ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या. या वीजचोर ग्राहकांविरोधात ‘महावितरण’कडून फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीजचोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

वीज वितरणातील गळती आणि उत्पन्नातील हानी कमी करण्यासाठी ‘महावितरण’कडून वीजचोरीविरोधात नियमित कारवाई केली जाते. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी पुण्यासह पाचही जिल्ह्यांमध्ये महिन्यातून एक दिवस वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. वीजबिले न भरल्याने खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेणाऱ्या किंवा अन्य ठिकाणाहून आकडे टाकून वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरोधातही या मोहिमेत फौजदारी कारवाई केली जात आहे. वीजचोरी उघड झाल्यावर संबंधितांकडून दंडासह चोरीच्या वीजवापराचे संपूर्ण बिल वसूल केले जात आहे; अन्यथा त्यांच्याविरोधात वीज कायद्याच्या कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत मागील शनिवारी घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील १९ हजार ९०० वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली, असे ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागातर्फे सांगण्यात आले.
कुणाच्या खांद्यावर बिलाचे ओझे; ‘सेंट्रल बिल्डिंग’मध्ये स्वतंत्र वीजमीटर नसल्याने बांधकाम विभागावर बिलाचा भार
जिल्हा बेकायदा वीजवापराच्या घटना वीजचोरीची रक्कम

पुणे ८३८ १ कोटी २८ लाख ५८ हजार रुपये
सातारा १६६ १४ लाख ७६ हजार रुपये
सोलापूर ३१९ २५ लाख ४९ हजार रुपये
कोल्हापूर १५४ २८ लाख ७९ हजार रुपये
सांगली २३० २२ लाख १६ हजार रुपये
एकूण १७०७ २ कोटी १९ लाख ७८ हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed