• Sat. Sep 21st, 2024
कोकणात आक्रमक आंदोलन: उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक दीपक केसरकरांच्या घरावर चाल करून गेले, कारण…

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातच डीएड आणि बीएड बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या घरावरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बोंबाबोंब आंदोलन केले. डी. एड, बी. एड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी एकतर शिक्षक भरती करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी घेऊन आज सिंधुदुर्ग युवा सेनेच्या माध्यमातून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात “बोंबाबोंब ” आंदोलन करण्यात आले.

दीपक केसरकर यांच्या घरावर धावून आलेले शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला आहे. त्यामुळे पोलिसांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. काही झाले तरी आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. केसरकर आंदोलन दडपू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. हे आंदोलन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

लढणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा, वंचितचा मराठा आरक्षणाला पाठिंबा: प्रकाश आंबेडकर

सकाळपासूनच दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीसही आंदोलनकर्त्यांवर लक्ष ठेऊन होते. उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा नेते गवळी तिठा परिसरातून आंदोलनकर्ते चालत दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर येण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी केसरकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘शिक्षक भरती करा, अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली. केसरकर हे शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी ओळखून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. केसरकर हे सावंतवाडीचे आमदार आहेत. परंतु ते कोल्हापूर आणि मुंबईत पालकमंत्री म्हणून तिकडेच फिरत आहेत. त्यांचं आपल्या मतदारसंघाकडे लक्ष नाही. आपण शिक्षणमंत्री आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे ते गेली अनेक महिने मागणी असून सुद्धा बेरोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत,’ असा घणाघात आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed