१९७२ मध्ये शेवती नावाच्या गावाचे पुनर्वसन येळसे गावातील काही गायरान जागेवर करण्यात आले. एवढ्या वर्षांच्या कालवधीनंतर शेवती गावाला येळसे ग्रामपंचायतीवर सरपंचपदाचा मान मिळाला आहे. ७० वर्षीय बायडाबाई कालेकर यांच्या रुपाने शेवती वसाहतीला सरपंचपद मिळाले असल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. या गावाची १२०० हून अधिक लोकसंख्या आहे.
७० वर्षीय बायडाबाई यांना सामाजिक काम करण्याची आवड आहे. त्या गृहिणी असल्याने कुटुंबाची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती. मात्र ती जबाबदारी सांभाळून त्या सामाजिक काम करत होत्या. सर्वसामान्य कुटुंबातील महिला ७० व्या वर्षी सरपंच झाल्याने कुटुंब देखील आनंदात आहे. येळसे ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच सीमा मुकुंद ठाकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या जागी बायडाबाई ज्ञानेश्वर कालेकर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्या जागेसाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या एकूण सात सदस्यांपैकी पाच सदस्य उपस्थित होते.
या निवडीवेळी तलाठी सचिन जाधव, ग्रामसेवक एम. के. चांदगुडे, रामदास कदम ठाकर, भाऊ ठाकर, तुकाराम कालेकर, यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य सीमा ठाकर, विमल कालेकर, अक्षय कालेकर, सचिन सुतार यांच्यासह माजी सरपंच विजय ठाकर, राष्ट्रवादी माजी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत हे उपस्थित होते.
दरम्यान, ७० व्या वर्षी बायडाबाई कालेकर यांना सरपंचपदाची संधी मिळाल्याने गावाच्या विकासासाठी सरकारच्या विविध योजना राबवणार असल्याचे कालेकर यांनी सांगितले आहे. ग्रामस्थांच्या असलेल्या एकीमुळे मला या पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.