शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीमार करण्याचं कारण काय? राळेगणसिद्धी गावात अण्णा हजारे जसं मंदिरात आंदोलन करायला बसायचे तसंच जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही लोक आंदोलनाला बसले होते. परंतु जालन्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागायला नको म्हणून सरकारने आंदोलन मोडून काढलं. त्यासाठी मंत्रालयातून एक अदृश्य फोन गेला. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी, महिला, वृद्धांवर लाठीमार केला. अमानवी पद्धतीने लोकांना मारलं गेलंय, त्यांची डोकी फोडली, लोकांवर गोळ्या चालवल्या गेल्या. एवढं सगळं करण्याचं कारण काय? असा सवाल राऊत यांनी विचारला.
शासनाकडून झालेला लाठीमार यामागे २ कारणं आहेत. शासन वैफल्यग्रस्त आहे. सरकारला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. सरकार मराठा समाजाच्या आंदोलकांना तोंड देऊ शकत नाही. एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला आंदोलकांवर असा लाठीमार करायचा, सरकारची ही कुठली पद्धत? असाही जळजळीत सवाल राऊत यांनी विचारला.
ज्या दिवशी लाठीमार केला गेला, त्यादिवशी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू होती. देशातला आणि महाराष्ट्रातील मीडिया उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी काय बोलतात, याकडे टक लावून बसला होता. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा लाठीमार घडविण्यात आला, असा आरोपही राऊत यांनी केला.
राज्यात लाखोंचे मराठा मोर्चे निघाले, त्याचं जगभरात कौतुक झाले. त्यांच्याकडून एकदाही बेशिस्त वर्तन झालं नाही. उद्धवजींच्या काळातही आंदोलने झाले पण पोलिसांनी कधीही संयम सोडला नाही. मग आताच असं नेमकं काय संकट आलं की पोलिसांना लाठीमार करावा लागला. सखोल चौकशी करणार आहात ना…? तो अदृश्य फोन कुणाचा हे आम्हाला सांगणार का? असा बोचरा सवाल राऊत यांनी विचारला.