रेल्वे स्थानके स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येते. मात्र काही प्रवाशांकडून याकडे दुर्लक्ष करून रेल्वे स्थानकांत अस्वच्छता करण्यात येते.
नालासोपारा रेल्वेस्थानकात गुरुवारी आरपीएफ जवान अनिल राठी ड्यूटीवर नियुक्त होते. स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील आरक्षण केंद्राजवळ आरोपी चांद खान हा लघुशंका करत होता. यावेळी आरपीएफ जवानाने खान याला, स्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यास सांगितले. त्याचबरोबर उघड्यावर लघुशंका करू नये, अशा सूचनाही आरपीएफ कर्मचाऱ्यानी दिल्या. आरपीएफ जवानाने हटकल्याचा राग मनात ठेवत चांद खानने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आरपीएफ जवानाला मारहाण केली. दरम्यान, स्थानकातील अन्य कर्मचारी आणि पोलिसांनी हे पाहून जवानाच्या मदतीसाठी धाव घेतली.
आरपीएफ जवानाने केलेल्या तक्रारीच्या आधारे, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे आणि सरकारी कर्मचाऱ्य़ाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणणे या गुन्ह्याखाली आरोपी चांद खानला अटक करण्यात आली आहे, असे वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.