• Sat. Sep 21st, 2024

गौरी-गणपतीचं आगमन होणार गोड; आठ लाख नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा, ‘या’ तारखेपासून वितरण सुरु

गौरी-गणपतीचं आगमन होणार गोड; आठ लाख नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा, ‘या’ तारखेपासून वितरण सुरु

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: गौरी गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. येत्या बुधवार, ६ सप्टेंबरपासून वितरणाला सुरुवात होणार असून हा शिधा नागपुरात यायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आठ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल, असे जिल्हा पुरवठा शाखेकडून सांगण्यात आले.

-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक यांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय २२ ऑगस्ट २०२३ रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला.

-यापूर्वीही गेल्यावर्षी २०२२च्या दिवाळी सणानिमित्त तसेच २०२३मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा शिधा वितरित करण्यात आला होता. आता गौरी-गणपतीतही हा तो वितरित करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंद आहे.

सणाला शिधा नाही अन् नंतर भेटून काय करायचं? पाडव्याला आम्ही आमची भाजी भाकरी खातो

-गेल्यावेळी शिधा मिळायला विलंब झाल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. यंदा तरी हा शिधा वेळेत मिळावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांनी व्यक्त केली. रवा, चणाडाळ, साखर हे प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर खाद्यतेल याचा यात समावेश असेल.

-अ‌वघ्या १०० रुपयांत लाभार्थ्यांना हा शिधा उपलब्ध करून देण्यात येईल. रवा प्राप्त झाला असून इतर साहित्यही वेळेत येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी सांगितले.

असे होणार वितरण

औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील म्हणजेच एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांनाही हा शिधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गौरी-गणपती आणि दिवाळीला असा दोनदा हा शिधा मिळणार आहे. ई-पॉस मशिनद्वारे याचे वितरण करण्यात येईल. गौरी-गणपतीसाठी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या काळात आणि दिवाळीसाठी १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळेल.

राज्यात एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ लाभार्थी आहेत. नागपूर शहरातील लाभार्थ्यांची संख्या ३ लाख ८५ हजार असून ग्रामीणमध्ये ४ लाख १६ हजार लाभार्थी असल्याचे रमेश बेंडे यांनी सांगितले. दोन्ही सणांसाठीच्या या योजनेसाठी राज्य शासनाने एकूण ९०६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.

कुणाच्या आदेशाने हे सगळं घडलं? संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक, जालन्याला जाणार, समाज बांधवांची भेट घेणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed