राजकीय लढ्यात एकत्र
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचा सध्याच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष भाजप आहे. आजच्या भेटीत ममता बॅनर्जी यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं दर्शन देखील घेतलं. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना राखी बांधली. राजकीय लढाईत एकत्र असताना ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं नवे ऋणानुबंध निर्माण केले आहेत.
उद्धव ठाकरेंना राजकीय लढाईत पाठिंबा
गेल्या वर्षी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील आमदार खासदार फुटले त्यावेळी देखील ममता बॅनर्जींनी ठाम भूमिका घेतली. ममता बॅनर्जींनी त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या स्वागताला आदित्य ठाकरे विमानतळावर उपस्थित होते.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा इंडिया असेल, असं म्हटलं. केंद्र सरकारनं सिलेंडरच्या दरात कपात केल्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सरकारनं अगोदर दर का वाढवले होते, असा सवाल केला. ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र आणि देशातील सर्वांना रक्षाबंधनाच्या सदिच्छा दिल्या. तर, बंगालमध्ये बहिणींना देखील राखी बांधली जाते असं सांगितलं.