यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचे संकेत आयएमडी हंगामाच्या सुरुवातीला दिले होते. सुरुवातीला वातावरणातील प्रतिकूल घडामोडींमुळे मान्सून पुढे सरकण्यास दिरंगाई झाली. राज्यात मान्सून दाखल झाला मात्र वेगवेगळ्या अडथळ्यांमुळे अनुकूल वातावरण मिळाले नाही. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात सरासरीचे आकडे गाठता आले नाहीत. जूनच्या तुलनेत जुलैमहिन्यात अधिक पाऊस पडला, तरीही सरासरीपेक्षा कमी नोंद झाली. ऑगस्टमध्ये बहुतांश दिवस आकाश अंशत: ढगाळ होते, मात्र मोजके काही दिवस पाऊस पडला. घाट माथ्यावर जुलैच्या तुलनेत पावसाचा जोर ओसरला होता. शहरात १ ते ३० ऑगस्टपर्यंत ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या महिन्याच्या सरासरीपेक्षा शंभर मिलीमीटरने कमी पाऊस झाला आहे.
दरम्यान, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानात नोंद होऊन सरासरीपेक्षा चार अंशाने जास्त ३१.९ आणि किमान २०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सकाळपासून रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके जाणवत होते, दुपारी उकाडा वाढला होता. घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
राज्यात काय आहे पावसाबाबतचा अंदाज?
‘येत्या चार दिवसात मान्सून काही प्रमाणात सक्रीय होत असून ३ आणि ४ सप्टेंबरला राज्यात प्रामुख्याने विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यामध्ये समाधकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याने ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे,’ असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.
तीन महिन्यातील : पुण्यातील सरासरी पाऊस — पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
जून : १७३.४ : १०४
जुलै : १८१.४ : १३९
ऑगस्ट १४५.२ : ४३
एकूण पाऊस : ५०० : २८६