• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्रात पुन्हा संतापजनक घटना! दलित तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं टांगलं आणि…

    महाराष्ट्रात पुन्हा संतापजनक घटना! दलित तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं टांगलं आणि…

    अहमदनगर : शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशायावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी दलित संघटना आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हरेगाव येथे बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    हरेगाव येथे मोलमजुरी करणाऱ्या तीन दलित तरुणांच्या बाबतीत ही घटना घडली आहे. शेजारी उंदीरगाव येथील गलांडे वस्तीवरील शेळी आणि चार कबुतरे या तरुणांनी चोरल्याचा गलांडे यांना संशय होता. त्यावरून संशयित युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे, मनोज बोडखे, दुर्गेश वैद्य यांनी या तीन तरुणांना कपडे काढून झाडाला उलटे टांगले. चोरीसंबंधी विचारणा करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आल्याचे पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे तरूण आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात.

    लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांचा आग्रह असतो पण…

    या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरमधील रिपब्लिकन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये सुरेंद्र थोरात, प्रदीप थोरात, दीपक ओहळ, नाना खरात, अक्षय माघाडे, अमोल शिंदे, मिलिंद सोनावणे यांचा समावेश आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी रुग्णालयात जाऊन पीडीत तरुणांची विचारपूस केली. त्यांचे आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

    दरम्यान, यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा प्रदीप थोरात यांनी दिला आहे. तर याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed