शनिवार बाजारपासून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. काहींनी महापालिका यंत्रणेची प्रतिकात्मक अंतयात्रासुद्धा काढली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समारोप झाला छोटेखानी सभेनंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले.
शहरातील रस्त्यांसाठी आलेला ८० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने हडप केला. नाट्यगृहाच्या उर्वरित बांधकामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर होऊनही सरकारने देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप करून मंजूर निधी तातडीने द्यावा. रमाई घरकुल योजनेची रक्कम अडीच लाखांवरून साडे तीन लाख रुपये करावी. दुरवस्थेतील रस्त्यांची दुरुस्ती करावी. कल्याण मंडपम व बी. रघुनाथ सभागृहाची भाडेवाढ रद्द करावी. भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करावे. दररोज शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा आदींसह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चाला जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र वायकर, ज्योतीताई ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. परभणी विधानसभा संपर्क प्रमुख राजेश सकपाळ, डॉ. विवेक नावंदर, विशाल कदम, सुरेश ढगे, अतुल सरोदे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.