म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड : तालुक्यातील अजिंठ्याजवळ बायोडिझेलचा अवैध साठा गुरुवारी रात्री जप्त करण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर, अजिंठ्यापासून दीड किलोमीटरवर असलेल्या हॉटेलजवळ ही कारवाई केली. लोखंडी टॅँकरमध्ये भरून ठेवलेले तीन हजार लिटर बायोडिझेल असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री साडेआठला अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहंमदी बिन इसा मोहंमदी (३९, रा. अजिंठा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
अजिंठा- फर्दापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये अवैध बायोडिझल विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. छाप्यात अधिकृत डिझेलपंपासारखा अवैध बायोडिझेल विक्रीचा थाटलेला पंप पाहून पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारीही अवाक झाले.
अजिंठा- फर्दापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये अवैध बायोडिझल विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. छाप्यात अधिकृत डिझेलपंपासारखा अवैध बायोडिझेल विक्रीचा थाटलेला पंप पाहून पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारीही अवाक झाले.
अजिंठा पोलिसांनी ही माहिती शुक्रवारी तहसीलदारांना दिली. यानंतर पुरवठा नायब तहसीलदार कमल मनोरे, मंडल अधिकारी प्रभाकर चव्हाण, तलाठी विजय राठोड, आशिष औटी यांनी घटनास्थळी पंचनामा केला व बायोडिझेलचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणी शुक्रवारी रात्री मंडल अधिकारी प्रभाकर चव्हाण यांनी अजिंठा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
विशेष पथकाची कारवाई
ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस उपनिरीक्षक खाडे, पोलिस कर्मचारी अर्जुन जलगाळे, मुळे, दसरे यांनी केली.