आर्यन राहुल राठोड असे गोळीबार झाल्यानंतर जखमी झालेल्या चिमुकल्याच नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर शहरातील अहिल्यादेवी नगर येथे नवनाथ अंबादास भराड यांच घर आहे. ज्या घरामध्ये दुसऱ्या मजल्यावर बीड येथील रहिवासी राहुल कल्याण राठोड आणि संगीता राहुल राठोड व त्यांचा मुलगा आर्यन हे राहतात. गेल्या चार महिन्यांपासून ते भराड्यांच्या घरांमध्ये राहतात. राहुल हे एका खाजगी कर्ज वितरण बँकेमध्ये कर्मचारी आहेत. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये बंदुकीने गोळीबार केल्याचा आवाज आला. हा गोळीबार राहुल राठोड यांच्या घरामध्ये झाला होता. दरम्यान गोळीबार करणाऱ्या व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला होता. राहुल यांची पत्नी संगीता या मुलाला गोळी लागली असं म्हणून ओरडत होत्या. यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले या घटनेनंतर राहुल व त्यांची पत्नी जखमी मुलाला घेऊन खाजगी रुग्णालयात गेले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले पोलीस निरीक्षक सत्यजित ताइतवाले पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटी हे कर्मचाऱ्यांचे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाहणी केली असता घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये पोट माळ्यावर एक गावठी कट्टा आढळून आला. त्यातूनच तीनपैकी दोन गोळ्या झाडल्याचे समोर आले. यावेळी घरात जागोजागी रक्ताचा सडा पडलेला आढळून आला. दरम्यान हा गोळीबार नेमका कोणी केला? गोळीबार करण्यामागचा उद्देश काय होता? हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलीस छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहेत.