• Sat. Sep 21st, 2024
आश्रमशाळेत मुलांना विषबाधा; खासदार विद्यार्थ्यांच्या भेटीला, रुग्णालयाला दिले ‘असे’ निर्देश

भंडारा: येरली येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेनंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खासदार सुनील मेंढे यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या उपचाराच्या बाबतीत कुठलीही हयगय होऊ देऊ नका, असे निर्देश त्यांनी तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रम शाळेत दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना त्रास व्हायला लागला.
वाटाणा, बटाटा, वरणभात खाताच प्रकृती बिघडली; भंडाऱ्यातील आश्रमशाळेत ३७ मुलांना विषबाधा
यात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे जाणवल्यानंतर याची माहिती गोबरवाही आरोग्य केंद्राला देण्यात आली. काही विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ४३ विद्यार्थ्यांना भंडारा आणि तुमसर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या २३ विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी करत धीर दिला. रुग्णालयातील खाटांवर असलेल्या बेडशीट संदर्भात खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ त्या बदलून देण्याच्या सूचना केल्या. उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अतुल टेंभुर्णे यांच्याकडून माहिती जाणून घेत उपचारात कुठे कमी पडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रवादीतील फूट हा गेम नाही, ऑलम्पिक असू शकतो, बच्चू कडूंचा ‘प्रहार’

रुग्णालय परिसरात उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक आणि नातेवाईक यांचीही खासदारांनी भेट घेत त्यांना धीर दिला. सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर असून रुग्णालय प्रशासनाकडून योग्य प्रकारे औषधोपचार केला जात असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले. परिसरातील इतरही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांची यावेळी खासदारांनी संवाद साधला. खासदारांसोबत जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे, विकास मदनकर आणि अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed