२४ वर्षापूर्वी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. गेल्या २४ वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय पक्षाच्या वतीनं घेतले गेले. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिला आरक्षण, शेतकऱ्यांची कृषी कर्ज माफी शरद पवार यांनी घेतल्याचं रोहित पाटील म्हणाले. महाराष्ट्रात डान्सबार बंदीचा निर्णय घेतला गेला, असं रोहित पवार म्हणाले.
भाजपच्या काळात महापुरुषांचा अपमान होताना बघतोय. कुणीही उठतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतं, कुणीही उठतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलतं, शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा अपमान होईल असं बोलतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातीलचं नव्हे देशातील लोकांना जगण्याचा अधिकार दिला, फुले दाम्पत्यानं शिक्षणाचा अधिकार दिला. या सर्वांचा अपमान केला जात असेल तर येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपला भीमटोला देण्याची गरज आहे, असं रोहित पाटील म्हणाले.
छत्रपती शाहू महाराजांचा विचार जोपासण्याची वेळ आलेली आहे. पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता. त्यावेळी शाहू महाराजांनी तोफा वितळवून शेतकऱ्यांना अवजारं देण्याची भूमिका घेतली होती. आज शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या मातीची पुन्हा मशागत करण्याची वेळ आलेली आहे, असं रोहित पाटील म्हणाले. कोल्हापूरमध्ये जातीय तेढ निर्माण केली जात आहे. जी भूमी छत्रपती शाहू महाराजांचा विचार मानते तिथं शाहू महाराजांचा विचार टिकवण्याचं आव्हान आपल्यापुढं निर्माण झालेलं आहे.
कोल्हापूरच्या लोकांनी आपल्या गाडीचं नाव चांद्रयान ठेवायला सुरुवात केलेली आहे. कोल्हापूरमधील रस्ते चंद्रासारखे झाले आहेत. पुण्याला आयटी पार्क उभं केलं, सोलापूरला आयटी पार्क उभं केलं, तसं आयटी पार्क कोल्हापूरमध्ये उभं करावं अशी युवकांची भावना आहे, असं रोहित पाटील म्हणाले.
आपल्याला रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल. २०२४ च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायचंय आणि दिल्लीला महाराष्ट्राची ताकद दाखवून द्यायची वेळ आलीय,असं रोहित पाटील म्हणाले.