मिळालेल्या माहितीनुसार, विजय बहादूर सिंह (२१, रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई. मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे या बोगस टीसीचे नाव आहे. दिवा, कोपर, डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अवैधरित्या दंड वसूल करणाऱ्या तोतया टीसीसंदर्भात गुरूवारी स्थानक प्रबंधक कार्यालयात तक्रार आली. या तक्रारीला अनुसरून दिवा स्थानकातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुंबईतील मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगईया यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर खातरजमा केली असता विजय सिंह नावाचा कोणताही टीसी नसल्याचे सांगण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडे सापडलेले ओळखपत्रही बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
लोहमार्ग पोलीस फौजदार शंकर पाटील यांनी कस्सून चौकशी केल्यानंतर त्याला प्रथम ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तेथे गुन्हा नोंदविल्यानंतर घटना कोपर ते डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान घडली असल्याने हा गुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करून पुढील चौकशीसाठी या तोतयाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अटकेची कारवाई केल्यानंतर शुक्रवारी आरोपीला लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या बोगस टीसीने आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली ? त्याने अशा पद्धतीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का ? ओळखपत्र त्याने कुठून बनवून घेतले ? या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली चौकस तपास सुरू करण्यात आला आहे.