शरद पवार यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यामागे दोन-तीन कारणं आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात जाऊन वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधात पक्षाने अपात्रता याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच खरा असल्याचा दावा सांगितला आहे. त्यामुळे आता राजकीयदृष्ट्या विचार केला तर शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहील. भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये अजित पवार यांच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम राहील. त्यामुळे सरकारमध्ये जम बसवणे अजित पवार यांना कठीण जाईल. तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत घडेल.
आणखी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात संभ्रम राहिला, कोणत्या गटात जायचे हे त्यांना ठरवता आले नाही तर अजित पवार यांना संपूर्ण पक्षावर नियंत्रण मिळवणे अवघड जाईल. त्यामुळे अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारसोबतची भविष्यातील राजकीय वाटचाल तितकीशी सुकर ठरणार नाही, अशी शरद पवार यांची खेळी असावी, असे मत अभय देशपांडे यांनी व्यक्त केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस झालेले बंड आणि फुटीचे स्वरुप साधारण सारखेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही आमदारांचा मोठा गट फुटून अजित पवार यांच्यासोबत गेला आहे. या आमदारांच्या पाठिशीही महाशक्ती उभी आहे. मात्र, अनेक वर्षांचा अनुभव आणि मुत्सद्दीपणा असलेल्या शरद पवार यांनी ही परिस्थिती अशाप्रकारे हाताळली आहे की, अजित पवार यांच्यासोबतच्या नेत्यांमध्येही अजूनही संभ्रम आहे. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात. या शक्यतेने कोणताही नेता थेट भूमिका घ्यायला तयार नाही, असेही अभय देशपांडे यांनी सांगितले.
अजित पवारांची भूमिका स्पष्ट आहे, ते मोदींसोबत: उदय सामंत
पवारांच्या विधानानंतर संभ्रमात राहायची आवश्यकता नाही.अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की,ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत.अजित दादांकडून कुठलाही संभ्रम नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने अजित दादांचे स्वागत होत आहे ते न भूतो न भविष्यती आहे. त्याच्यावर जर प्रतिक्रिया अशी असेल की अजित दादा नेते आहेत. तर मला वाटतं की,काही लोकांचं पाऊल NDA कडे येत आहे का, अशी शंका निर्माण होत आहे. INDIA आघाडी किती एकसंध राहते हे पाहणं आवश्यक आहे, हा खरा संभ्रम त्यांच्यासाठी आहे, असा दावा उदय सामंत यांनी केला.