• Mon. Nov 25th, 2024

    Ganeshotsav 2023: गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! या कारणामुळे मुंबई महापालिकेने नाकारले ९९ अर्ज

    Ganeshotsav 2023: गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! या कारणामुळे मुंबई महापालिकेने नाकारले ९९ अर्ज

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा १ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या काही सार्वजनिक मंडळांना मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली. रस्त्यावर मंडप नकोत, असे सांगून मंडप उभारणीचे ९९ अर्ज नाकारण्यात आले. परवानगीसाठी यापैकी काहींनी वारंवार अर्ज केल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.

    मुंबई महापालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलिस, वाहतूक पोलिस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. मंडपांसाठी मंडळांना परवानगीकरिता शुल्क भरणे आवश्यक नाही. मंडप परवानगी नि:शुल्क आहे. तर १०० रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत याबाबतचे एक हजार ८०० अर्ज मुंबई महापालिकेकडे आले आहेत. यापैकी एक हजार १०० परवानग्या देण्यात आल्या. तर ९९ अर्ज नाकारण्यात आले, अशी माहिती उपायुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली. मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असे लक्षात आल्यावर प्रथम वाहतूक पोलिसांनी ही परवानगी नाकारली. त्यानंतर मुंबई महापालिकेनेही अर्ज नाकारले, असे बिरादार यांनी सांगितले. परवानगी नाकारण्यात आलेल्या काही मंडळांनी परवानगीसाठी वारंवार अर्ज केले आहेत. जागा बदलल्यास त्यांना परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    आरे तलावासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न

    आरे दुग्ध वसाहतीतील संपूर्ण परिसर केंद्र सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) म्हणून घोषित केल्याने आरेतील तलावात यंदा गणेशमूर्ती विसर्जनास मनाई करणारा आदेश आरे दुग्ध वसाहत प्रशासनाने काढला आहे. यंदा आरे तलावातच विसर्जन करण्याच्या लेखी मागणीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेकडून दुग्ध वसाहत प्रशासनाकडे दोन दिवसांत पाठवण्यात येणार आहे, असे बिरादार यांनी सांगितले.

    कृत्रिम तलावांची संख्या वाढणार?

    घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेल्या वर्षी १५४ कृत्रिम तलाव होते. यंदा ते ३०८ केले जाणार आहेत. मात्र त्यापेक्षाही जास्त कृत्रिम तलाव तयार होऊ शकतात का, याची चाचपणी पालिकेकडून केली जात आहे. त्यानुसार वॉर्डस्तरावर याचा आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed