• Mon. Nov 25th, 2024

    पुणेकरांनो मुलांवर लक्ष ठेवा; शाळकरी मुलेही अडकली व्यसनांच्या विळख्यात, ‘या’ वयोगटातील संख्या अधिक

    पुणेकरांनो मुलांवर लक्ष ठेवा; शाळकरी मुलेही अडकली व्यसनांच्या विळख्यात, ‘या’ वयोगटातील संख्या अधिक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: नामांकित कॉन्व्हेंट शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक मुलगा सुटीच्या कालावधीत मॉलमधील गेम झोनमध्ये खेळण्यासाठी जाऊ लागला. तेथे वाईट संगत लागल्याने सुरुवातीला सिगारेट आणि नंतर हुक्का ओढण्याची सवय लागली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने कालांतराने महागड्या व्यसनांच्या आहारी गेला. सद्यपरिस्थितीत तो व्यसनांशिवाय राहूच शकत नसून, त्याच्यावर एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे त्याचे शिक्षणही बारावीतून अर्धवट सोडण्याची वेळ आली. व्यसनाधीनतेमुळे आयुष्य पणाला लागलेल्या अनेक तरुणांपैकी हे एका तरुणाचे प्रातिनिधिक उदाहरण.

    एकेकाळी शहरातील व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये जवळपास नव्वद टक्क्यांहून अधिक रुग्ण दारूच्या व्यसनामुळे भरती केले जात होते. आता ते प्रमाण बदलले आहे. दाखल रुग्णांमध्ये ३० ते ४० टक्के दारूचे व्यसन असलेले असतात तर गांजा, चरससह अन्य व्यसने करणाऱ्यांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून येते. शाळकरी मुलांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. एक १९ वर्षांचा मुलगा नशेचे विविध प्रयोग करत आज पूर्णत: व्यसनांच्या आहारी गेला आहे.

    अर्रर्रर्रर्र… पगार झाल्याच्या आनंदात तळीरामाचा प्रताप; दोन दिवस थेट गटारीच्या पाइपमध्ये दोन वास्तव्य

    व्यसनासाठी पैसे न दिल्यास आई-वडिलांना मारहाण करण्यापासून घरातील वस्तूंची तोडफोड करण्यापर्यंत सर्व गोष्टी त्याने केल्या आहेत. या प्रकारांना कंटाळलेल्या त्याच्या पालकांनी अखेर त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे. त्या मुलाला वयाच्या १६व्या वर्षापासून व्यसन जडले होते. एका मॉलमधील गेम झोनमध्ये नियमित जात असताना, तेथे झालेल्या मित्रांची वाईट संगत त्याला नडली. अकरावी आणि बारावीच्या वर्षात तो सिगारेट, हुक्का, गांजा, दारू, एलएसडी स्टॅम्प यासारखी व्यसने करू लागला. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. आता गेल्या महिन्याभरापासून व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    वास न येणारी व्यसने

    शाळकरी मुले किंवा महाविद्यालयीन तरुण वास न येणाऱ्या तसेच मेंदूवर थेट परिणाम करणाऱ्या व्यसनांना प्रामुख्याने निवडत असल्याचे निरीक्षण आहे. मद्यप्राशन करून घरी गेल्यास आई-वडिलांना कळेल, यामुळे मुले दारूकडे वळत नाहीत. त्याऐवजी एलएसडी स्टॅम्प, बंटाची गोळी आदी वास न येणारी व्यसने ते करतात. प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार अंमली पदार्थाचा प्रकार बदलतो.

    तरुणाई गांजा, एलएसडीच्या आहारी

    व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ३० ते ५० वयोगटातील पुरुष प्रामुख्याने दारूच्या व्यसनामुळे दाखल झालेले असतात. गांजा आणि अन्य प्रकारच्या व्यसनांमुळे दाखल होणाऱ्यांमध्ये १७ ते २२ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेले तरुण एलएसडी स्टॅम्पचे व्यसन करतात.

    मेंदूवर परिणाम करणाऱ्या वस्तूंच्या सेवनामुळे तरुण आक्रमक होतात.

    वाढत्या गुन्हेगारीला अशा प्रकारच्या व्यसनांची पार्श्वभूमी असते.

    व्यसनाधीनतेमध्ये तरुण आणि तरुणींचे प्रमाण जवळपास सारखेच आहे.

    मुलांना कमी वयातच व्यसन जडते. पालकांच्या दुर्लक्षामुळे ही गोष्ट वेळीच त्यांच्या लक्षात येत नाही. मुले पूर्णत: व्यसनावर अवलंबून राहू लागतात. पालकांना मुलांच्या व्यसनाधीनतेची जाणीव होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते, असे अनेक प्रकरणांत दिसून आले आहे.

    – अजय दुधाणे, अध्यक्ष, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र

    तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed