• Sat. Sep 21st, 2024

तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…

तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाल विवाहाचा प्रकार ठाण्यात समोर आला असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा ४२ वर्षांचा नवरदेव, मुलीचे वडील आणि दोन्ही बाजूकडील नातेवाईकांसह अन्य एकजण अशा आठ जणांविरुद्ध नुकताच कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने नवरदेवाने मुलीच्या आई-वडिलांना सोने आणि पैसे देण्याचे आमिष दाखवले होते. मुलीचा लग्नास विरोध होता, तरीही तिचे लग्न लावून देण्यात आले.

नवी मुंबईला राहत असताना अल्पवयीन मुलीचे तिच्या आईवडिलांनी नवी मुंबईतीलच एका ४२ वर्षाच्या व्यक्तीबरोबर लग्न ठरवले होते. नवरदेव दोन तोळ्यांचे दागिने तसेच खर्चासाठी एक लाख रुपये देण्यासह लग्न सोहळ्याचा सर्व खर्चही नवरदेवच करणार होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या लग्नास मुलीच्या पालकांनी संमती दिली असली तरी मुलीचा विरोधा होता.

युट्यूबवर पाहून पत्नीची प्रसूती करायला गेला, मुलाचा जन्म तर झाला, पण तिचा जीव गेला…
दरम्यान, मुलीच्या आईचे निधन झाले आणि महिनाभरापूर्वी मुलगी कुटुंबासह ठाण्यातील बाळकूम, दादलानी परिसरात राहण्यास आली. नवरदेवाने मुलीच्या वडिलांना लग्नासाठी काही पैसे दिले होते. मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर २२ ऑगस्ट ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. परंतु, लग्न न करण्यावर मुलगी ठाम होती. तसे तिने वडिलांना सांगितले होते. मात्र, वडिलांनी तिचे काही ऐकले नाही. तिने तेथील लोकांना माझे लग्न जबरदस्तीने लावून देत आहेत. यातून मला वाचवा असे सांगितले होते.

लग्नाचा दिवस उजडल्यानंतर दुपारी बाळकुम, दादलानी येथे मुलीचे संबधित व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यात आले. यावेळी मुलीचे वडील अन्य नातेवाईक तसेच नवरदेवाचा भाऊ त्यांच्याकडील इतर नातेवाईक उपस्थित होते. सायंकाळी ४ वाजता अचानक त्याठिकाणी पोलिस दाखल झाल्यानंतर एकच पळापळ सुरू झाली. काहीजण तेथून पळूनही गेले. तर, काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

अल्पवयीन असतानाही लग्न लावल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर तिचे वडील, काकीसह अन्य नातेवाईक आणि नवरदेव, त्याचा भाऊ आणि इतर अशा एकूण आठ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी नवरदेवासह त्याचा भाऊ, मुलीचे वडील आणि अन्य दोघे अशा एकूण पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed