दरम्यान, सना हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी रब्बू चाचा ऊर्फ रविशंकर यादव (वय ५०) याला अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी हत्याकांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ अमित शाहू, अमितचा मित्र राजेश सिंग, रब्बूचा मुलगा धमेंद्र यादव व कमलेश पटेलला अटक केली. पाचही आरोपींची २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. या प्रकरणात सहभाग असलेला पप्पूचा नोकर जितेंद्र गौड याला साक्षीदार बनविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रब्बू चाचा हा वाळू माफिया आहे. पप्पू फरार असतानाच चाचानेच त्याला मदत केली. ५ ऑगस्टला सना यांच्या आई जबलपूरला गेल्या असता रब्बू हा सना यांच्या आईला भेटला. ‘अब सना कभी घर नही आयेगी’, असे त्याने सना यांच्या आईला म्हटले होते. यावरून सना यांची हत्या करण्यात आल्याची माहिती रब्बूला होती, ही कडी जोडत पोलिसांनी रब्बूलाही गजाआड केले.
या प्रकरणात नागपुरातील नेते व पदाधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली असता, सध्या तरी नागपूर व राज्यातील कोणत्याही नेत्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे आढळलेले नाही. प्राथमिक चौकशीत, पप्पू व सनाचे लग्न झाले होते. पैशाच्या वादातून पप्पूने सनाची हत्या केली. तो सना यांना चित्रफीतींच्या आधारे ब्लॅकमेल करीत होता, असे त्यांनी सांगितले.