• Sat. Sep 21st, 2024

दाभोलकरांच्या जीवाला धोका असल्याची तक्रारच नव्हती; १० वर्षांनी सीबीआयचा दावा

दाभोलकरांच्या जीवाला धोका असल्याची तक्रारच नव्हती; १० वर्षांनी सीबीआयचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याबाबत कोणतीही तक्रार पोलिसांना देण्यात आली नव्हती, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांनी मंगळवारी उलटतपासणीदरम्यान दिली.

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात ‘सीबीआय’च्या तपासी अधिकाऱ्याची उलटतपासणी सुरू आहे. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर त्यांच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्या आणि घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या बॅलेस्टिक एक्स्पर्टला दाखवून याचे शस्त्र कसे असेल, याबाबत विचारणा केली होती का? गोळ्या किती अंतरावरून मारल्या असतील, हे बॅलेस्टिक एक्स्पर्टला विचारले का? ७.६ एमएमच्या गोळ्या कोणत्या शस्त्रातून फायर होतात? असे प्रश्न बचाव पक्षाच्या वतीने सिंग यांना विचारले. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी मंगळवारी उलटतपासणी घेतली.

डॉ. दाभोलकर यांचे नरेंद्र महाराज आणि त्यांच्या अनुयायांसोबत वैमनस्य होते का, अशी विचारणा केली. त्यावर सिंग यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. डॉ. दाभोलकर यांचा खून झाला, त्या वेळी घटनास्थळाजवळ नरेंद्र महाराजांचे कोणी अनुयायी होते का, याबाबत तपास केला का, असा प्रश्न साळशिंगीकर यांनी विचारला. त्यावर सिंग यांनी ‘नाही’ असे सांगितले.
दाभोलकर, लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये समान धागा आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा CBIला सवाल
या शक्यतांनुसार तपास केला का?

डॉ. दाभोलकर यांचे वर्षा देशपांडे यांच्यासोबत न्यायालयात वाद सुरू होते. डॉ. दाभोलकर यांनी जुलै २०१३मध्ये बोगस डॉक्टरांविरोधात आंदोलन छेडले होते; तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील गैरव्यवहारातून त्यांचा खून झाल्याच्या शक्यतेने तपास केला का, आदी प्रश्न बचाव पक्षाच्या वतीने सिंग यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज, बुधवारी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed