विजयालक्ष्मी ज्वेलर्समध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात चोरी झाली होती. चोरांनी दुकानातील तिजोरी फोडून ३ कोटी २० लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास चालू केला. आरोपी नेपाळमधील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, आरोपींचा पत्ता नसल्याने या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मालमत्ता शोध पथकाकडून शोध चालू होता. तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या आधारे मिळालेल्या माहितीनंतर काही आरोपींची नावे निष्पन्न झाली. तसेच, आरोपींचा लखनऊ, बनारस आणि भारत-नेपाळ सीमा भागात शोध घेण्यात आला.
गुन्हे शाखेचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी देखील जाऊन आले. अखेर या गुन्ह्यात माधव चुन्नालाल गिरी, दिनेश उर्फ सागर चंद्र रावल, दीपक रामसिंग भंडारी यांना अटक करण्यात आली. तिन्ही आरोपी नेपाळचे राहणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले. त्यांच्याकडून ३३ लाखांचे ५५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून अटक आरोपींविरुद्ध नवी मुंबईतील कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच, रावल याच्याविरुद्धही यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
या गुन्ह्यात दहा जणांचा सहभाग असून उर्वरित सात आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद रावराणे, सहायक पोलिस निरीक्षक महेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील प्रधान, पोलिस कर्मचारी संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजेंद्र घोलप, अर्जुन करळे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी केली.