• Mon. Nov 25th, 2024

    खाकीचे बळ अपुरेच! आयुक्तालयांच्या आकृतिबंधातील सुधारणा निष्फळ; नाशिकसह अन्यत्र ‘आऊटसोर्सिंग’

    खाकीचे बळ अपुरेच! आयुक्तालयांच्या आकृतिबंधातील सुधारणा निष्फळ; नाशिकसह अन्यत्र ‘आऊटसोर्सिंग’

    सौरभ बेंडाळे, नाशिक : वीस-बावीस लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरात सरासरी हजार नागरिकांमध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याने वारंवार मनुष्यबळवाढीची मागणी होत असतानाच आकृतिबंधात झालेली सुधारणा फलदायी नसल्याचे समोर येत आहे. फक्त संवर्गातील पदांमध्येच बदल झाल्याने अपुऱ्या मनुष्यबळावरच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राहणार आहे.

    नाशिक आयुक्तालयातील पोलिस आणि प्रशासकीय विभागात तीन हजार ४०५ पदे मंजूर आहेत. प्रशासकीय सेवेतील गट-ड संवर्गातील ३४ पदांसह राज्यातील इतरही आयुक्तालयांत ‘आऊटसोर्सिंग’ करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. या सुधारणेमुळे फक्त संवर्गातील पदांमध्येच बदल झालेला आहे. गृह विभागाने राज्यातील दहा पोलिस आयुक्तालयांच्या मंजूर पदांच्या आकृतिबंधात सुधारणा केली आहे. त्यामध्ये पोलिस नाईक हे पद संवर्ग रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस शिपाईनंतर थेट पोलिस हवालदार अशी नियुक्ती असेल. या अनुषंगाने सुधारित आकृतिबंध जाहीर करताना त्यामध्ये मनुष्यबळवाढीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळातच आयुक्तालयाला ‘पोलिसिंग’ करावे लागणार आहे. या निर्णयाअंती राज्यातील दहा आयुक्तालयांपैकी ठाणे शहरात १० हजार २७८, पुण्यात ९ हजार ७५१, नागपुरात ८ हजार ८७६, नवी मुंबईत ५ हजार २५६, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ हजार ८६०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ हजार ८५७, मीरा-भाईंदर-वसई-विरारमध्ये ३ हजार ३८१, सोलापुरात २ हजार २७२ आणि अमरावतीत २ हजार १२१ नियमित पदे मंजूर आहेत. या व्यक्तिरिक्त प्रत्येक ठिकाणी प्रशासकीय विभागातील गट-ड संवर्गातील पदांसाठी बाह्य स्रोतांद्वारे सेवा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रमुख आचारी, सहायक आचारी, आचारी, सफाई कामगार, कार्यालयीन शिपाई, कक्ष सेवक, बॉय सर्व्हंट या पदांचा समावेश आहे.

    हाताशी मोजकेच पोलिस

    नाशिक पोलिस आयुक्तालयात २६६ अधिकारी आणि तीन हजार ७१ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती आयुक्तालय, उपायुक्त, सहायक आयुक्तांची कार्यालये यासह चौदा पोलिस ठाण्यांत आहे. यासह नियंत्रण कक्ष, विशेष शाखा, परवाना विभाग, वाहतूक विभाग, तीन गुन्हे शोध पथके, चार गुन्हे प्रतिबंधक पथके, निर्भया-दामिनी पथके, भरोसा सेल, पारपत्र, डायल-११२, बँड पोलिस, वायरलेस, मोटार परिवहन विभाग, दंगल नियंत्रण, जलद प्रतिसाद, मुख्यालय, वज्र विभागतही कर्मचारी नियुक्त आहेत. आयुक्तालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्त वार्ता, महाराष्ट्र पोलिस अकादमी, गुन्हे अन्वेषण विभागातही कर्मचारी नियुक्त आहेत. त्याव्यतिरिक्त आमदार, खासदार, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी अंगरक्षक व ‘व्हीआयपी’ सुरक्षेतही मनुष्यबळ तैनात असते. परिणामी, तीन हजारांपैकी फक्त दीड-दोन हजार पोलिस कर्मचारीच एकावेळी शहरात सेवा बजावत असतात. सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीसह लोकसंखेच्या तुलनेत हे मनुष्यबळ अल्प आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसह ‘प्रभावी पोलिसिंग’करिता मनुष्यबळात वाढ होण्याची अपेक्षा नागरिकांसह पोलिस दलातून व्यक्त होत आहे.

    प्रशासकीय मनुष्यबळ

    नाशिक आयुक्तालयाच्या प्रशासकीय विभागात वैद्यकीय अधिकारी, विधी अधिकारी वर्ग-१, कार्यालय अधीक्षक, स्वीय सहायक, विधी अधिकारी वर्ग-२, उच्चश्रेणी लघुलेखक, सहायक लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, लघु टंकलेखक, औषधनिर्माता प्रत्येकी एक यासह अंगली मुद्रातज्ज्ञ तीन, विधी अधिकारी वर्ग-३ दोन, प्रमुख लिपिक सहा, वरिष्ठ श्रेणी लिपिक १८, परिचारिका दोन आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक २५ कार्यरत आहेत.

    नाशिक आयुक्तालयाचे मनुष्यबळ
    वर्ग : पोलिस : प्रशासकीय
    १ : ७२ : २
    २ : १९४ : ११
    ३ : ३,०७१ : ५५
    एकूण : ३,३३७ : ६६८
    पोलिस अधिकारी : आकृतिबंधानुसार मंजूर पदे
    नाशिकच्या लेडी सिंघमची कौतुकास्पद कामगिरी; डोंगरदऱ्यांत शिरुन हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त
    पोलिस आयुक्त (विशेष पोलिस महानिरीक्षक) : १
    पोलिस उपायुक्त : ४
    सहायक आयुक्त : ८
    पोलिस निरीक्षक : ५९
    सहायक निरीक्षक : ६७
    पोलिस उपनिरीक्षक : १२७
    सहायक उपनिरीक्षक : २८४
    पोलिस हवालदार : ८३३
    पोलिस शिपाई : १,८०९
    सहायक उपनिरीक्षक चालक : १
    पोलिस हवालदार चालक : २९
    पोलिस शिपाई चालक : ११५

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *