• Sat. Sep 21st, 2024

माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

बीड: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली आहेत, या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती त्यांचे कुटुंबीय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना त्या महिला भगिनीला रडू कोसळले.

शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत ती भगिनी धाय मोकलून रडू लागली. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने मुंडेंना सांगितले. त्याबरोबर धनंजय मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोनही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्यची मदत देण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असे भावनिक आवाहन या प्रसंगाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed