या सर्वेक्षणाविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, हा सर्व्हे करताना ४८ मतदारसंघात जाऊन तेथील सद्य राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांशी आम्ही युती करु. भाजपला सर्व पातळ्यांवरुन उखडून फेकायचे आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस हायकमांड आणि शरद पवारांची ३१ तारखेला चर्चा
अजित पवार व शरद पवार भेटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत आणि त्यांनी या भेटीवर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. इंडिया आघाडी सोबतच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत, मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील.
पंतप्रधानांनी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करताना, महागाई परदेशातील परिस्थितीमुळे वाढली आम्ही वाढवली नाही असे खोटं सांगितले. मोदी सरकार देशातील आर्थिक स्थिती हाताळू शकले नाही म्हणूनच महागाई वाढली, रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत आहे तरिही महागाईचे खापर मात्र परदेशावर फोडून मोदींनी हात वर केले. मोदी सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या सरकारच्या काळात महिला अत्याचारही वाढले, सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. मोदी सरकारविरोधात जनतेत तीव्र संताप आहे पण मोदी मात्र पुन्हा येणार अशी घोषणा करतात, लोकशाहीत असा अहंकार चालत नाही, असेही पटोले म्हणाले.