स्वातंत्र्यदिनानिमित्त वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते मुख्यालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मंचावर पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अजिंक्य बगाडे यांच्यासह आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील हे उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी शहरातील विविध समस्या मांडल्या. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर पालिका अधिकाऱ्यांवर संतापले. तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी शहराचा सत्यानाश केला आहे. स्वत:ला काय राजे समजता का, आयुक्त तुम्हाला पालिकेत येऊन फटकावेन, अशा भाषेत त्यांनी आयुक्तांना सुनावले.
यामध्ये मुख्यतः पाणीचा प्रश्न उपस्थित केला. याआधी एक दिवसाआड पाणी यायचे. मात्र सध्या चार ते पाच दिवसाआड येत असल्याने नागरिक हैराण झाले असल्याचे सांगितले. यावर आमदारांनी आयुक्तांना जाब विचारला. विजेचा खेळखंडोबा होत असल्याने अनेकदा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यावर महावितरणचे कारण सांगू नका, असे आमदार म्हणाले. तसेच कचरा प्रश्न उपस्थित केला असता यावर उत्तर देण्यासाठी उपायुक्त चारुशिला पंडित उभ्या राहिल्या असता त्यांना बसण्यास सांगून पोपटाकडून उत्तरे नकोत, आयुक्तांकडून हवी असल्याचे देखील ठाकूर म्हटले. याविषयीचे व्हिडीओही व्हायरल झाले.
ठाकूर यांच्या दमदाटीबाबत आयुक्तांसह कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्वानी मौन बाळगणेच पसंत केले. मात्र त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय.
ठाकूर प्रत्येक अधिकाऱ्याचा अपमान करत राहिले
पालिका उपायुक्त चारूशिला पंडित कचऱ्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी उभ्या राहिल्या असता ए… शहाणपणा करू नकोस. मला पोपटाकडून उत्तरे नको आहेत, कमिशनरकडून उत्तर हवे.. अशी भाषा हितेंद्र ठाकूर यांनी वापरली.
वाहतूक कोंडीच्या प्रश्नाव उत्तर देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे उभे राहिले असता तुमचे सर्वेक्षण घाला चुलीत, कसले सर्वेक्षण करतो? तुम्ही डोक्यावर नाचायला लागला आहात. तुमच्या कानाखाली वाजवली पाहिजे, अशी दादागिरीची भाषा ठाकूर यांनी केली.
तुम्ही फक्त वसुली करत असता. वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करेन, असं एका उपायुक्ताला ठाकूर म्हणाले. नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला खडसावून आमदार ठाकूर त्यांना अपमानित करत राहिले.