सद्दाम सत्तार शेख (वय २७ वर्ष, रा. स्वामी मळा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटना कळताच संबंधित नातेवाईक, भागातील नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेमुळे संतापलेल्या शेख यांच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीच्या घरी जात दारावर लाथा मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला असल्याने भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेली माहिती अशी की, इचलकरंजी येथील कोले मळा येथील एका शाळेत हा प्रकार घडला. पहिलीच्या वर्गात टेम्पो चालक सद्दाम सत्तार शेख आणि सलमा आलासे या दोघांचीही मुले शिकण्यास आहेत. शाळेत दुपारच्या सत्रात सुट्टीमध्ये खेळता खेळता सलमा आलासे यांच्या मुलाचे शेख यांच्या मुलाशी किरकोळ कारणातून भांडण सुरू झाले आणि दोघात धक्काबुक्कीही झाली.
भांडण झाल्याचे कळताच शेख याने आलासे यांच्या मुलास कानशिलात लगावली. मात्र वेळीच शाळेतील शिक्षकांनी हस्तक्षेप करत शेख यांची समजूत काढत वादावर पडदा टाकला. मात्र आपल्या मुलाला कानशिलात लगावल्याचे सलमा आलासे यांना समजताच त्यांनी आपला भाऊ शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) याला बोलावून घेतले.
याआधी पासूनच शेख आणि शब्बीर गवंडी यांच्यात वाद होता. शब्बीर शाळेत येताच सलमा आणि शब्बीरने शेखला मारहाणीचा जाब विचारला, तसेच एकमेकांवर धावून गेले. शाब्दिक वादाचे रूपांतर लाथाबुक्क्या आणि मारामारीत झाले. यावेळी शेख याच्या छातीवर मार बसल्याने तो जमिनीवर कोसळला. यावेळी तातडीने शेखला दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.
यानंतर शेख यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी आयजीएम रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. तसेच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी संशयित आरोपीच्या घरी जात दारावर लाथा मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आता तिघा जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघांनाही ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.