• Sat. Sep 21st, 2024

नियमांची ऐशी-तैशी! स्कूलबसमध्ये एकाचवेळी कोंबले ९२ विद्यार्थी; मोशीतील बसचालकाचा संतापजनक प्रकार

नियमांची ऐशी-तैशी! स्कूलबसमध्ये एकाचवेळी कोंबले ९२ विद्यार्थी; मोशीतील बसचालकाचा संतापजनक प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशी येथील एका शाळेच्या स्कूलबसमध्ये एकाचवेळी ९२ विद्यार्थी कोंबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित स्कूलबसची विद्यार्थी वाहतुकीती क्षमता केवळ ४२ होती.

श्वासही घेता येणार नाही, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी बस पकडून कारवाई केली. त्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली.

मोशीत ‘एक्सलन्स स्कूल’ आहे. या स्कूलच्या विद्यार्थी वाहतुकीसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्कूलबसची क्षमता ४२ आसनांची आहे. मात्र, स्कूलबस चालकाने बसमध्ये क्षमतेपेक्षा ५० विद्यार्थी अधिक बसवल्याचे आढळून आले. एका आसनावर चार ते पाच विद्यार्थी दाटीवाटीने बसविण्यात आले होते. भरीसभर म्हणून दोन आसनरांगांमधील मोकळ्या जागेतही विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले. त्यांच्या बॅगाही तेथेच ठेवण्यात आल्या.

ही बस बाहेरून पाहिली असता विद्यार्थी कोंबल्याचे दिसून येत होते. दोनच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड आरटीओचे एक पथक स्कूलबसची पाहणी करत असताना, मोशी येथे ही बस अधिकाऱ्यांच्या नजरेच्या टप्प्यात आली. अधिकाऱ्यांनी तातडीने बस थांबवून दाटीवाटीने उभारलेल्या विद्यार्थ्यांना खाली उतरविले. त्यानंतर स्कूलच्या मुख्याध्यापकांना जागेवर बोलावून, सत्य परिस्थिती सांगितली. त्यानंतर बसचालकावर कारवाई करीत ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर दोन स्वतंत्र बसची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्यात आले.

मोटार वाहन निरीक्षक भालचंद्र कुलकर्णी, तानाजी धुमाळ, सहायक मोटार वाहन निरीक्षक तेजश्री कुलकर्णी, अनमोल चव्हाण, चालक प्रकाश खामकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पनवेल RTO चं आरोग्य शिबीर, वाहनचालकांची तपासणी अन् धक्कादायक बाब समोर, काय घडलंं?
सर्रास असुरक्षित विद्यार्थी वाहतूक

शहरातील शेकडो शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूलबसद्वारे केली जाते. सध्या आरटीओकडे त्यातील ११७५ स्कूलबसची नोंदणी आहे. मात्र, अनेक स्कूलबस, व्हॅन परवानगीविना विद्यार्थी वाहतूक करतात. याकडे पालक, शाळा प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसमध्ये घेतल्यास त्यांची अडचण होऊ शकते. अवघडून बसणे किंवा उभे राहण्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आजार होऊ शकतात; तसेच अपघाताची शक्यताही नाकारता येत नसल्याचे एका आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले.

दररोज विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

‘एक्सलन्स स्कूल’च्या बसमध्ये नेहमीच विद्यार्थी खचाखच भरले जातात. त्यातच त्यांची दुसरी बस नादुरुस्त झाल्याने एकाच बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविण्यात येतात. दररोज एका बसमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० ते ७२च्या घरात असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.
नाशिक-पुणे महामार्गावर ‘शिवाई’ प्रवास सुसाट; सवलतींचाही प्रवाशांना लाभ, जाणून घ्या बसची खासियत?
नियमांची ऐशी की तैशी

एकाचवेळी ९२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकाकडे पक्के लायसन्स नसल्याचे आढळून आले आहे. याशिवाय त्याच्याकडे स्कूल व्हॅन चालविण्यासाठी आवश्यक बॅचही नसल्याचे दिसून आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार घडला, त्या वेळी त्याच्या अंगावर गणवेशही नव्हता.

शालेय व्यवस्थापन आणि शालेय परिवहन समिती यांनी विद्यार्थी वाहतुकीबाबत जागरूक राहायला हवे. विद्यार्थी वाहतूक सुरक्षितपणे होत आहे की नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. पालकांनीही पाल्याचा प्रवास कसा होतो, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले नाहीत ना, याची खात्री करायला हवी. आरटीओच्या माध्यमातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सातत्याने तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed