या मशीनद्वारे दिवसाला ५०० मीटर इतकं काम होऊ शकतं, मात्र त्यासाठी पावसाची उघडीप असावी लागते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर हे काम जलद गतीने होण्यासाठी तूर्तास दोन मशीन असल्या, तरी या मशीनची संख्या वाढवून जास्तीत जास्त काम कसं होईल, याकडे आपण लक्ष देत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
या आधुनिक मशीनच्या सहाय्याने जुना रस्ता खोदून त्यामध्ये सिमेंट टाकून व काही केमिकलचा वापर करून हा रस्ता बनवण्याचं काम हे रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथून सुरू करण्यात आले आहे. तसेच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेलं काम हा बेस अधिक मजबूत असल्यामुळे पंधरा ते वीस वर्षे टिकू शकतो, असा मोठा दावा या आधुनिक तंत्राद्वारे करण्यात आला आहे.
कोकणात मुंबई गोवा महामार्ग रखडला असून रायगड जिल्ह्यात या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या गाड्या वाटेतच पंक्चर होण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अनेकांना पाठदुखी सारखे आजार उद्भवले आहेत. या सगळ्या विरोधात अलिकडे जन-आक्रोश आंदोलन समितीकडून हे मोठे आंदोलन करण्यात आलं होतं.
मराठी पत्रकार परिषदेकडूनही याच हायवेचं काम तात्काळ मार्गी लागावं यासाठी रायगड जिल्ह्यात आजच वाकण फाटा येथे पत्रकार आंदोलन करणार आहेत. इतकेच नव्हे तर दोन मंत्री व दोन खासदार यांना एसएमएस करून आपला संताप कळवणार आहेत. देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सगळ्यात रखडलेला कोकणातील हा मुंबई गोवा महामार्ग आहे. त्यामुळे या रखडलेल्या एकंदरच कामाबद्दल नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.