• Sat. Sep 21st, 2024

मराठी नाटक अर्धा तास उशिरा संपलं, थप्पड फेम गीता जैन भडकल्या, अधिकाऱ्याला नको नको ते सुनावलं

मराठी नाटक अर्धा तास उशिरा संपलं, थप्पड फेम गीता जैन भडकल्या, अधिकाऱ्याला नको नको ते सुनावलं

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमधील स्व. लता मंगेशकर नाट्यगृहात पहिल्याच मराठी नाटकाचा प्रयोग रविवारी पार पडला. मात्र या नाट्यप्रयोगाला विलंब झाल्याने त्यापुढील राजस्थानी नाटकाच्या आयोजकांनी मराठी नाटकाच्या प्रयोगादरम्यान गोंधळ घातला. महापालिकेने त्यापुढील राजस्थानी नाटकाला ठरलेल्या वेळेत नाट्यगृह उपलब्ध करून न दिल्याने या वादाला तोंड फुटले आहे. या मुद्द्यावरून आता आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक हे आमनेसामने आले आहेत.

हॉल मिळायला उशीर, मराठी नाटक लांबलं; आमदार गीता जैन यांनी कर्मचाऱ्याला धारेवर धरलं

मिरा-भाईंदरकरांसाठी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह पालिकेने वर्षभरापूर्वीच खुले केले. या नाट्यगृहात हिंदी, गुजराती व इतर भाषक नाटके व इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत होते. मात्र मराठी नाट्य निर्मात्यांनी मंगेशकर नाट्यगृहाकडे पाठ फिरवली होती. परिणामी, मराठी नाट्यप्रेमी मागील अनेक महिन्यांपासून नाट्यगृहात मराठी नाटक कधी लागते? याच्या प्रतीक्षेत होते. नाट्यगृहात रविवारी ‘करून गेलो गाव’ या मराठी नाटकाचा प्रयोग प्रथमच आयोजित करण्यात आला होता.

मराठी नाटकाला अर्धा तास उशीर, राजस्थानी प्रेक्षकांनी थिएटरमध्येच गोंधळ घातला

या व्यतिरिक्त एका राजस्थानी नाटकाचे आयोजनही रविवारी या नाट्यगृहात करण्यात आले होते. त्याचे बुकिंग मराठी नाटकाच्या आयोजनापूर्वीच करण्यात आले होते. त्या नाटकाला सायंकाळी ५.३० ची वेळ देण्यात आली होती. मराठी नाटक सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, ते संपण्यासाठी अर्धा तास उशीर झाला, म्हणजेच सहा वाजले. त्यामुळे राजस्थानी नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी तसेच आयोजकांनी मराठी नाटक सुरू असतानाच गोंधळ घातला.

त्यानंतर आमदार गीता जैन या नाट्यगृहात आल्या आणि व्यवस्थापकांना ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याचे लेखी लिहून देण्याची मागणी करत धारेवर धरले. या प्रकारावर आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेतली. यावेळी मराठी नाटकात व्यत्यय आणणे ही चुकीची भूमिका असून, यापुढे असे प्रकार घडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वेळेचे नियोजन फसले

मराठी नाटकाच्या निर्मात्यांनी रविवारची वेळ मागितली होती. वर्षभर मराठी नाटकांचे आयोजन न झाल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, बुकिंग असलेल्या हिंदी व मराठी नाटकाला एकाच दिवशी नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यानुसार मराठी नाटकाला साडेतीन ते साडेपाच ही वेळ दिली होती. परंतु काही कारणास्तव मराठी नाटक संपण्यासाठी विलंब झाला. यामुळे पुढील नाटक पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक संतप्त झाल्याचे सांगत, महापालिका उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed