भारतातील कानाकोपऱ्यात ‘भारत छोडो’च्या गर्जना होऊन त्यात नाशिककरांनीही सूर मिसळला होता. दि. ९ ऑगस्ट १९४२ रोजी शिंपीनामक तरुणाच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी शिंपीला अटक करण्यात आल्याने नाशिककर चिडले. भडकलेल्या जमावाने इंग्रजांवर सोडावॉटरच्या बाटल्या फेकल्या व दगडफेक केली. या मोर्चामध्ये एकही काँग्रेस नेता नव्हता, तरीही नाशिकमधील गद्रे, खाडिलकर, आर. एन. चौधरी यांना अटक करण्यात आली. या लढ्यात अनेक नागरिक सामील झाल्याने तुरुंगात गेले, तेव्हा त्यांची मुक्तता करण्यात यावी म्हणून नाशिकच्या नागरिकांनी मोर्चा काढला. त्यावेळी झालेल्या दंगलीत हेड कॉन्स्टेबल शिवा देवजी व इतर इंग्रज शिपायांवर चिडलेल्या नाशिककरांनी चाकूहल्ला केल्याने दोन शिपाई जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोनजण जखमी झाले. गोळीबाराने जमाव पांगला गेला. नाशिककरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाची माहिती अहवालाच्या रुपात दररोज मुंबईतील ब्रिटिश होम डिपार्टमेंटला पाठविली जात होती. त्यातून नाशिककरांच्या ९ ऑगस्ट १९४२ मधील लढ्याच्या नोंदी समोर आल्या आहेत.
नाशिकमध्ये १९४२ मध्ये काय घडले?
१० ऑगस्ट रोजी पंचवटीत दंगल उसळली. जमावाने पोलिस अधिकाऱ्यास बदडले. मोठी दगडफेक झाली. लाठीमारानंतर जमाव पांगला. ११ ऑगस्टला सुमारे तीन हजार नाशिककरांनी मोर्चा काढला. पकडलेल्यांना बंदोबस्तात घेऊन जाताना जमावाने दगडफेक केली. पोलिसांच्या गोळीबारात दोघे जखमी झाले. या घटनेनंतर जनजीवन सुरळीत झाले. मात्र, विद्यार्थी पुन्हा लोकांच्या ‘हॅट्स’ जाळून, मोर्चे काढत आक्रमक झाले. वर्षभर चळवळ तीव्र होत गेली. टेलिफोनच्या तारा तोडणे, खांब उखडणे यासंदर्भात वामनराव यार्दींना जबाबदार धरण्यात आले. धरणे आंदोलनात स्त्रिया व मुलांचाही सहभाग राहिला. ३१ ऑक्टोबरला रात्री रेल्वे रूळ उखडले गेले. पोलिसांच्या नेमबाजीच्या सरावाचे फलके नदीपात्रात फेकण्यात आले. २८ नोव्हेंबर रोजी पोलिस चौकी जाळण्यात आली. भूमिगतांना आश्रय दिल्याबद्दल काहींना शिक्षा झाली. १५ डिसेंबर रोजी वामनराव यार्दींना अटक झाल्याने निदर्शने, मोर्चे आणि दगडफेक झाली. २३ जानेवारी १९४३ रोजी सरकारी मुलींच्या शाळेतील वाचनालयात जिवंत गावठी बॉम्ब आढळला. एकूणच १९४२ पासून पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत असंख्य नाशिककर स्वातंत्र्यलढ्यात झुंजले.
इंग्रजांच्या दस्तावेजांतील आंदोलक…
दि. ९ ऑगस्ट १९४२ ते पुढे तीन वर्षांतील इंग्रजांच्या दस्तावेजांत ‘भारत छोडो’च्या घोषणा देत स्वातंत्र्याची मागणी करीत आंदोलन करणाऱ्यांमध्ये पुढील नावे दिसतात- वामनराव यार्दी, काकासाहेब गद्रे, डॉ. खाडिलकर, गोविंदराव देशपांडे, ओढेकर, दत्तात्रेय काळे, पी. आर. कुलकर्णी, वि. ग. केळकर, कोऱ्हाळकर, कोरे, खुशालसिंग, नारायणसिंग, अनंत गडकरी, यशवंत गायकवाड, विश्वनाथ गायधनी, गुजराथी, डॉ. गोगटे, गोसावी, चव्हाण, चंद्रात्रे, जानोरकर, जोशी, टकले, डोंगरे, तेली, देवरे, पिंगळे, पुरे, शहाबुद्दिन, शेलार, सहस्रबुद्धे.