सरला गर्ग यांचे पती पेट्रोलिअम कंपनीत संचालक पदावर कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर ३ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत सरला यांना आंतरराष्ट्रीय व्हॉटस अॅप क्रमांकावरून फोन आला. यासह एका ई-मेलद्वारे सरला यांना संपर्क साधण्यात आला. त्यामध्ये ‘तुमच्या पतीच्या नावे चार कोटी रुपयांची लॉटरी जाहीर झाली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल’, असे संशयितांनी म्हटले होते.
वृद्ध महिलेने त्यावर विश्वास ठेवत पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खासगी बँकेच्या दोन वेगवेगळ्या खात्यात चार लाख ३८ हजार रुपये भरले. मात्र, तीन महिने उलटूनही चार कोटी रुपये खात्यात वर्ग न झाल्याने फसवणूक झाल्याचा गर्ग यांना संशय आला. त्यानुसार त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत तक्रार अर्ज दिला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपासणी केल्यानंतर सायबर चोरट्यांनी हा गंडा घातल्याचा संशय बळावला. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
ज्या बँक खात्यात तक्रारदाराचे पैसे वर्ग झाले आहेत. त्या बँकेशी संपर्क साधला आहे. त्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे. संशयित व्हॉटस अॅप क्रमांकाचीही तांत्रिक पडताळणी सुरू आहे. ई-मेल आयडीसंदर्भात तपास करून संशयितांचा माग काढत आहोत.
– रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर