३१ कोटी रुपयांची बनावट औषधे?
अहमदाबाद येथील मेसर्स इन्टास फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीचे ह्यूमन नार्मल इम्युनोग्लोब्युलिन फॉर इंट्राव्हिनस आयपी १० टक्के सोल्यूशन या त्यांच्या औषधाचे बनावट औषध बाजारात विकले जात असल्याचे कळवले होते. त्यानुसार औषध नियंत्रकांनी, वडाळा येथील फार्मा केअर स्पेशालिटी येथे छापा टाकला असता तेथे काही बनावट औषधे आढळून आली. ही बनावट औषधे जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे.
या बनावट औषधांच्या तपासात फार्मा केअर स्पेशालिटीने भिवंडी येथील ग्रोव्हर हेल्थ केअर येथून २६० इंजेक्शने खरेदी केल्याचे आढळले. यातील २५८ इंजेक्शनची विक्री मुंबई व आसपासच्या परिसरातील विक्रेत्यांना केल्याचे आढळून आले. त्यानुसार दादर फार्मा केअर स्पेशालिटीज, भिवंडी येथील मेसर्स गोव्हर हेल्थकेअर, मुंबईतील परफेक्ट लाइफ केअर, परळ येथील मेसर्स ए वन मेडिकल अँड जनरल स्टोसर्स, रॉयल केमिस्ट अँड ड्रगिस्ट, भांडुप, मेसर्स विजय लाइफ केअर, नेरळ येथील मेसर्स एपकॉम फार्मेक्स, मेसर्स सुपर स्पेशालिटी फार्मा, परफेक्ट हेल्थ केअर, जैन व्हॅक्सिन अँड मेडिकल्स यांच्यावर कारवाई करून प्राथमिक अहवाल नोंदविण्यात आला. या कारवाईमध्ये ३१ कोटी रुपयांच्या बनावट औषधांची विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बनावट औषध कोठे बनविण्यात आले याचा तपास करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून आर. ए. किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.