मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास मोठा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाताना हा अपघात झाला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघातग्रस्त गाड्या महामार्गावरून हटवण्यात आल्या.
अपघातात एकाला प्राण गमवावे लागले, तर पोलिसांनी या अपघातातील जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातानंतर हा ट्रक उलटल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.
मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचे प्रमाण, दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. कालच खंडाळा घाटाच्या बोगद्यात कंटेनर उलटल्याने वाहतूक वळवावी लागली होती. दुपारनंतर हा कंटेनर बोगद्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र आज सकाळच्या सुमारास पुन्हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईकडे जाणारी वाहतूक उर्से टोल नाका आणि खंडाळा घाटात वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. मात्र सलग अपघात होत असल्याने प्रावशी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
