आमदार निवासाच्या भूमिपूजनानंतर व्यासपीठावर घडलेल्या एका घटनेची सर्वत्र चर्चा झाली. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि अनेक मंत्री उपस्थित होते. भूमिपूजन पार पडल्यानंतर सगळे मान्यवर व्यासपीठावर पोहोचले.
व्यासपीठावर मंत्री रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, नीलम गोऱ्हे, राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस त्यांच्या त्यांच्या आसनांवर बसले होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर आले. त्यांची खुर्ची चंद्रकांत पाटील आणि गोऱ्हे यांच्या मध्ये ठेवण्यात आली होती. अजित पवार त्या खुर्चीवर बसले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंची खुर्ची रिकामीच होती.
मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमाला येणार नसल्यानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना शिंदेंच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली. तेव्हा अजित पवार काहीसे गांगरले. मात्र पुढच्याच क्षणी नार्वेकरांनी त्यांच्या शेजारील खुर्चीवर लावण्यात आलेलं स्टिकर काढलं. या स्टिकरवर मुख्यमंत्री असा उल्लेख होता. नार्वेकरांनी स्टिकर काढल्यानंतर पवार या खुर्चीत बसले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमात झालेल्या या घटनेबद्दल नार्वेकरांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना एक अतिशय उत्तम कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यात घडलेल्या त्या एकाच घटनेची निरर्थक चर्चा होऊ नये. मुख्यमंत्र्यांना त्या कार्यक्रमात वेळेवर पोहोचणं शक्य नव्हतं. मात्र कार्यक्रम योग्य वेळेत होणं गरजेचं होतं. त्यांनी त्यांच्या शुभेच्छा कळवल्या, असं स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिलं. तर मुख्यमंत्र्यांना ताप आला आहे. त्यांना थोडी कणकण जाणवत आहे. त्यामुळे ते कार्यक्रमाला आले नाहीत, असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी सांगितलं. अजित पवार अनावधानानं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले. कोणतीही गडबड नाही, असं गोगावले म्हणाले.