नाशिक, दि. 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांनी लिहिलेले साहित्य व काव्य जगभर प्रसिद्ध व वाचनीय आहे. या साहित्याचे सर्वांनी वाचन करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज नाशिक शहरातील एन.डी.पटेल रोडवरील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मंत्री छगन भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय कठिण परिस्थितीतून लढा देत कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. ही पृथ्वी श्रमिकांच्या श्रमावर उभी आहे असे त्यांचे विचार होते. श्रमिक, सर्वसामान्य नागरिकांचे दु:ख लोकशाहिरांनी आपल्या साहित्यातून मांडले. अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना दिली.