Ø उत्कृष्ट काम करणाऱ्या १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
Ø अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप
यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : राज्य शासनाचे ध्येयधोरण आणि निर्णयांची अंमलबजावणी करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे. महसूल विभाग हा शासन-प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे आयोजित महसूल सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपजिल्हाधिकारी रुपेश सिंगारे यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी हे शासनाचे निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. कोरोना संकटाच्या काळात रुग्णांच्या सेवेसाठी महसूल यंत्रणेने केलेले काम अभिनंदनीय आणि न विसरण्यासारखे आहे. मागच्या काळात महसूल राज्यमंत्री असतांना अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यात भोगवटा वर्ग 2 च्या जमीनी वर्ग 1 मध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेवून लाखो लोकांना त्याचा फायदा झाला. महसूल खात्याच्या कामामुळेही देशपातळीवर राज्याचे नाव आदराने घेतले जाते.
जिल्ह्याच्या महसूल प्रशासनात अनेक पदे रिक्त असतांनाही पूरपरिस्थिती सारख्या नैसर्गिक आपत्तीत अतिशय चांगल्यारितीने काम सुरु आहे. पूरामुळे शेती, घरे, दुकाने आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी तलाठ्यापासून संपूर्ण यंत्रणा संवेदनशीलतेने काम करतांना दिसत आहेत. जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करण्याची भूमिका राज्य शासनाची राहिल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी महसूल सप्ताहाची पार्श्वभूमी आणि उद्देशाची माहिती दिली. महसूल सप्ताहाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाच्याबाबतीत लोकांमधील आधीची भावना बदलण्याचा प्रयत्न देखील प्रशासन करीत आहे. मागच्या काळात प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी सर्वात आधी महसूल प्रशासन लोकांच्या मदतीला धावून येते. महसूल विभागाच्या योजना, उपक्रम आणि डिजिटल सोयीसुविधांच्या माध्यमातून लोकांपर्यंत लाभ पोहोचविण्याचा पुढाकार प्रशासनाने घेतला आहे, असे जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनीही मनोगत व्यक्त करुन सत्कारार्थी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महसूल प्रशासनाच्या कामाचा व्याप खूप मोठा आहे. प्रशासनाने सातत्याने काम करत राहावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रमाणपत्र देवून गौरव सन्मान करण्यात आला.
यावेळी अतिवृष्टीमुळे नाल्यांना आलेल्या पुरात वाहून मृत्युमुखी पडलेल्या शहरातील बेबी दौलतराव घोडमारे यांचा मुलगा निकेश दौलतराव घोडमारे यास चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेश पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य महसूल संघटनेचे संघटक नंदकुमार बुटे यांनी केले. सूत्रसंचालन तहसिलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी केले तर आभार मंडळ अधिकारी अनिल राजगिरे यांनी मानले.
लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनही केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना ८५ हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.