काय घडलं?
पुण्याला मजुरीसाठी गेलेला बिहारचा प्रदीप रविदास (४५) हा मनोरुग्ण तरुण गावी लखनपूर गया येथे दानापूर-पुणे एक्स्प्रेसने जात होता. यादरम्यान जनरल डब्यात त्याने अनेक लीला केल्या. प्रवाशांना मनस्ताप देणाऱ्या या मनोरुग्णाने धावत्या रेल्वेत दरवाजाजवळ जाऊन गाडीतून उडी मारण्याचाही प्रयत्न केला. सहप्रवाशांनी आपापल्या परीने त्याला प्रवासातील काही स्टेशनांपर्यंत थोपवून धरले. रेल्वेचे दरवाजे बंद करून घेतले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने काही प्रवाशांनी रेल्वे पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली. रेल्वे मनमाड स्थानकात आल्यावर रेल्वे पोलिसांनी डब्यात जाऊन त्याला ताब्यात घेऊन थेट पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी मायेने त्याची विचारपूस केली. त्याला उपचारांसाठी दवाखान्यात नेले. यादरम्यान त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यांना बिहार येथून मनमाडला पोहोचण्यास वेळ लागणार असल्याने त्याचे मायबाप होत डोळ्यांत तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवले.
गुरुवारी रात्री उशिरा त्याचे नातेवाइक बिहारहून आल्यानंतर त्याला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मानसिक दृष्ट्या दुर्बल तरुणाचा जीव वाचला. पोलिस हवालदार दिलीप महाजन, वाल्मीक कदम, नितीन मानकर, बाजीराव बोडके, पोलिस नाईक रेहान शेख, प्रकाश पावशे आदींनी या तरुणाला सांभाळण्यास मदत केली.