तन्मय हा डॉक्टर दांम्पत्य राहुल माका आणि शिल्पा माका यांचा मुलगा आहे. तन्मय नुकताच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथील सरस्वती इंग्लिश स्कूलमध्ये झालं आहे. विदेशातील पदवी मिळवण्याचं त्याचं स्वप्न होत. त्यामुळे त्याने बारावीनंतर मेडिकल किंवा इंजिनियरिंग क्षेत्र न निवडता विदेशातील विद्यापीठामध्ये इतर शिक्षण घेण्याचं ठरवलं.
यूट्यूबसह मित्रांकडून मिळवली माहिती
याबाबत त्याने युट्युब आणि मित्राकडून माहिती मिळवली. याच दरम्यान अमेरिकेच्या सन फ्रान्सिस्को येथील मिनर्व्हा विद्यापीठातर्फे या वर्षी सेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जगभरातील २२० तर भारतातून ६ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यातील तन्मय माका हा महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी होता. गणित आणि इंग्रजी विषयाच्या परीक्षेत त्याने १६०० पैकी १४५० गुण मिळवले. हैदराबाद मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
तन्मय माका हा अमेरिकेच्या सन फ्रान्सिस्को येथील मिनर्व्हा विद्यापीठात एमबीए आणि कंम्प्युटर सायन्स या पदवीच शिक्षण मिळणार असून त्याला विद्यापीठातर्फे दीड कोटी रुपये शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे. विशेष म्हणजे अमेरिका, जर्मनी, लंडन, अर्जेंटीना, साऊथ कोरिया, तायवान आणि भारत या सात देशात त्याला शिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. अमेरिकेच्या सन फ्रान्सिस्को येथील मिनर्व्हा विद्यापीठात प्रवेश मिळणारा तन्मय हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. तन्मयने नांदेडच नाही तर महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.