• Sat. Sep 21st, 2024
कोकणात पावसाचं थैमान, तीन जणांना नको ते धाडस भोवलं, एकानं जीव गमावला तर…

रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेडची जगबुडी नदी ही धोकादायक पातळीवरून वाहत आहे. दरम्यान रत्नागिरी तालुक्यात वाटद सुतारवाडी येथील नदीत पोहायला उतरलेले तीन कामगार बुडाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास वाटद खंडाळा येथे घडली आहे. यामध्ये विक्रम नरेशचंद्र (३४ मूळ रा.उत्तरप्रदेश), तरुणाचा बडून मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर येथील ओमकार जाधव (रा. कोल्हापूर) पाण्यातून वाहून गेला असून त्याचा शोध सुरु आहे. तिसरा गोपाळ नायरला याला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
Maharashtra Weather Update: मोठी बातमी! मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे काय परिस्थिती
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील गाव नदी येथे पोहायला अनेकजण येत असतात. बुधवारी लावगण येथील हे तीन कामगार पोहण्यासाठी वाटद खंडाळा येथे गेले होते. मागील तीन दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशात वर्षा पर्यटनाला जाताना सावधगिरी बाळगा असे आवाहन केले असताना देखील अनेकजण बेफिकिरीमुळे जीव गमावत आहेत. अशीच घटना तालुक्यातील वाटद येथे बुधवारी दुपारी घडली. एकाच कंपनीत कामाला असलेले हे तिघेही दुपारच्या सुमारास नदीत पोहण्यासाठी उतरले होते. अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढत गेला.

मात्र, याची जराही कल्पना त्यांना आली नाही. पाण्याचा प्रवाह वाढत असतानाच पोहायला नदीत उतरलेले तिघेजण अचानक गटांगळ्या खाऊ लागले. बघता बघता पाण्याच्या लोंढा आला आणि तिघेही वाहून जाऊ लागले. हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर काहींनी पाण्यात उड्या घेतल्या. तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित एकाचा शोध रात्री उशिरा पर्यंत सुरू होता. कोकणात पुन्हा एकदा पावसाने दुसऱ्या दिवशीच थैमान घातले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण तालुक्यातील वाशिष्टी नदी इशारा पातळी जवळ आहे.

पंचगंगेनं धोक्याची पातळी गाठली; लेकरांसह उभे संसार घेऊन नागरिकांचं निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर

राजापूर येथील पूरस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी आढावा घेतला आहे व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. राजापूर येथील जवाहर चौकाला पाण्याने वेढा घातला होता. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली होती. उद्या कदाचितही सुट्टी दुसऱ्या दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. चिपळूण येथे अनंत आईस फॅक्टरी पर्यंत बुधवारी दुपारी पाणी आले होतं. मात्र बुधवारी दुपारनंतर हा जोर ओसरला. चिपळूण नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या सर्व्हे नुसार १८१ दरड प्रवण गावे असून त्यांचे चार वर्ग केले आहेत.

वर्ग १ मध्ये १२ गावे, वर्ग २ मध्ये ३ गावे, वर्ग ३ मध्ये ७९ गावे व वर्ग ४ मध्ये ४६ गावांचा समावेश आहेत. या १८१ पैकी २३ गाव, ५७१ कुटुंब, १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच ५० पूरप्रवण गावे असून त्यापैकी २४ गाव, १३० कुटुंब, ४७७ लोकांना स्थलांतरीत केले असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजापूर तालुक्यातील तीन आणि लांजा तालुक्यातील तीन अशा दरड प्रवण सहा गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
विदर्भावर आभाळ कोसळलं! वीज पडून अनर्थ; सहा जणांचा मृत्यू, चंद्रपुरात पावसाचा हाहाकार
दरम्यान पावसाचा रेड अलर्ट लक्षात घेऊन तसेच जिल्ह्यातील पाच नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन जवळ बोलताना दिली आहे. सुट्टीचा आदेशही काही मिनिटांपूर्वी जारी करण्यात आला आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed