कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले. तसेच, आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे.
दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दहशतवाद विरोधी पथकाने तपासा दरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टर मध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
घातपातासाठीच्या सर्व पातळ्या आत्मसाद
इस्लाममध्ये सांगितलेल्या पवित्र गोष्टींसाठी जीव गेला, तरी ते करण्यासाठी त्यांची तयारी होती. त्यानुसार त्यांचे ब्रेन वॉश करण्यात आले होते. घातपातासाठी दहशतवादी विचारधारा स्वीकारण्यापासून प्रशिक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई करेपर्यंतच्या सर्व पद्धती दोघांनी आत्मसाद केल्या होत्या.
– इसिसशी सलग्न अल सुफा संघटनेची विचारधारा मानणारे
– दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्ब टेस्टींग
– दहशतवाद्यांकडून जप्त केलेली पावडर ही स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोझिव्ह वेपर डिटेक्टरमध्ये स्पष्ट
– देशविघातक कारवाई करण्याचा उद्देश असल्याचे पेन ड्राईव्हमधून आले समोर
– दोघेही आयसिसच्या अल सुफा संघटनेशी संबंधित असल्याचे समोर
– पेनड्राईव्ह मधून निघालेल्या माहितीचा ४३६ पानांचा तपास अहवाल न्यायालयात