मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नेमणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 25 : राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी -सुविधा पुरविण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनुसार यास जबाबदार असलेल्या गृहपालाच्या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
राज्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती आणि जागेसंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षा आणि सोयीसुविधासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
००००
वडपे ते ठाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या – मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 25 : वडपे ते ठाणे आठ पदरी रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केले आहे. या रस्त्याचे आठ पदरी रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य रईस शेख, बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या रस्त्याचे काम जवळपास ३० टक्के पूर्ण होत आले आहे. उर्वरित काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहील यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, पोलीस, परिवहन, महामार्ग, सर्व संबंधित यंत्रणांना या महामार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डने तातडीने वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी आणि रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात येतील, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/