• Sat. Sep 21st, 2024
जगातला सर्वात मोठा पक्ष ३१ वर्षांच्या तरुणावर तुटून पडलाय, ठाकरे भाजपवर बसरले

मुंबई : पक्ष फोडण्याच्या नादात इर्शाळवाडीकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे दुर्घटना घडली, अशा आशयाचं विधान करुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाजपला सुनावलं. भाजपनेही ट्विट करत टोलनाका कसला फोडता, काहीतरी बांधायला शिका, असा निशाणा साधताना कायदा सगळ्यांना समान आहे, असा इशाराच तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना दिला. भाजपच्या या इशाऱ्यानंतर मनसेने ट्विट करुन पुन्हा डिवचलं आहे. बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? असा सवाल विचारुन मनसेने देखील भाजपशी पंगा घेतला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-मनसे जवळ येत होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या दोन तीन वेळा गाठीभेटी झाल्या, पत्रव्यवहार झाले. पण राजकीय समीकरणे बदलताच एकत्क येणाऱ्या दोस्तांमध्ये पुन्हा दुरावा वाढयला लागला. अजित पवारांनी युती सरकारला पाठिंबा देणं, मनसेचा रुचलं नाही. राज ठाकरेंनीही यावरुन जाहीर नाराजी व्यक्त करताना भाजप आणि शिंदे गटाला खडे बोल सुनावले. त्यात इर्शाळवाडीची दुर्घटना घडल्यावर अमित ठाकरे यांनी याप्रकरणाला सत्ताधाऱ्यांना दोषी ठरवत पक्ष फोडण्यापेक्षा इर्शाळवाडीवर लक्ष दिले असते तर असा प्रकार टाळता आला असता, असं म्हटलं. अमित ठाकरेंची टीका भाजपला चांगलीच झोंबली. भरीस भर म्हणजे अमित ठाकरेंचं टोलनाका तोडफोड प्रकरणही समोर आल्याने भाजपने टीकेची संधी सोडली नाही. दरम्यान, या साऱ्या घटनांनी भाजप-मनसे आमनेसामने उभे ठाकले आहेत.

टोलनाके बांधायला शिका, अमित ठाकरेंवर भाजपची टीका

अमित ठाकरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसैनिकांनी फोडला. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करुन काही जणांना ताब्यात घेतलं. याच प्रकारावरुन आज भाजपने अमित ठाकरे यांना सुनावणारं ट्विट केलं. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, असं ट्विट भाजपने केलं.

मनसेकडून भाजपला जोरदार उत्तर

अमित ठाकरेंचं पक्ष फोडण्यासंबंधीचं विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय. आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत, असं ट्विट करत मनसेने देखील भाजपला जोरदार उत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed