• Sat. Sep 21st, 2024

अधिकमासामुळे गणरायांची स्वारी यंदा उशिराने; तीन आठवड्यांनी लांबले आगमन

अधिकमासामुळे गणरायांची स्वारी यंदा उशिराने; तीन आठवड्यांनी लांबले आगमन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हिंदू कालगणनेनुसार यंदा अधिकमास आल्यामुळे श्रावणातील विविध सण-उत्सवांसोबतच गणरायांचे आगमनही लांबणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन आठवड्यांनी हे आगमन लांबणार आहे. गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी श्रींची प्रतिष्ठापना झाली होती, मात्र, यंदा १९ सप्टेंबर त्यांचे आगमन होणार आहे.

अधिकमासाच्या आगमनाचा परिणाम काही दिवसांनी श्रावणातील सर्वच सण-उत्सवांवर होणार आहे. यंदा गणरायांचा मुक्काम १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत असणार आहे. दि. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. श्रावण मासाची चाहूल लागताच सण-उत्सवांचा माहोल तयार होतो. यावर्षी अधिक मासामुळे श्रावणातील सोमवारचे उपवास असो किंवा व्रतवैकल्ये, ती कधी पाळावीत याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. पंचांगकारांनी यावर प्रकाश टाकला. श्रावणाच्या अगोदर आलेला अधिकमास हा निजश्रावण म्हणून गृहीत धरला जातो. यात केवळ अधिक मासातील व्रतवैकल्यांचे पालन करावे. श्रावणातील उपवास आणि व्रतवैकल्ये शुद्ध श्रावण मासात करावीत, असा सल्लाही दिला आहे.

मूर्तिकारांना उसंत

श्रावण मासाची चाहुल लागताच श्रींच्या मूर्ती बनविण्याची लगबग सुरू होते. यंदा मात्र या मूर्तिकारांना वाढीव १८ दिवसांचा कालावधी हाती मिळणार आहे. श्रींची मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये मूर्तिकार कामाला लागले आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यापासूनच मूर्ती घडविण्याचे काम सुरू झाले आहे. श्रावण महिन्यात मूर्तीस अखेरचा आकार देत रंगरंगोटीच्या कामांना सुरुवात होणार आहे.
Nashik News: नवनियुक्त आयुक्तांना हवी बदल्यांची कुंडली; माहिती सादर करण्याचे अधिकाऱ्यांना फर्मान
सणांची बाजारपेठ गजबजणार

श्रावण महिन्यास दि. १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या महिन्यात मंगळागौर पूजन, नागपंचमी, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, रक्षाबंधन, जिवतीपूजन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीसारख्या सणोत्सवांची रेलचेल असते. या सणांसाठीची बाजारपेठही मोठी आहे. या सणोत्सवांसाठी लागणाऱ्या साहित्याने काही दिवसांतच शहरातील बाजारपेठ गजबजणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed